Mumbai Vikroli Silver Bricks: विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथके व पोलिसांकडून नाकाबंदीत वाहनांची तपासणी केली जात आहेत. विशेष म्हणजे आचारसंहिता लागल्यापासून २८० कोटींची रोकड आणि मौल्यवान वस्तू जप्त केल्या आहेत.
हायलाइट्स:
- निवडणुकीपूर्वी मुंबईत खळबळ
- कॅश व्हॅनमध्ये ६५०० किलो चांदीच्या विटा
- वीटांची किंमत तब्बल करोडोंच्या घरात
व्हॅनमधील या चांदींच्या विटांची किंमत करोडोंच्या घरात आहे, या वीटा ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून मुलुंडमधील एका गोदाममध्ये ठेवण्यासाठी नेण्यात येत असल्याची माहिती आहे. पोलिसांना आढळलेल्या या वीटा अधिकृत असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. मात्र, निवडणूक आयोग, इन्कम टॅक्स आणि पोलिसांकडून याचा अधिक तपास केला जात आहे. दरम्यान, पोलिसांकडून सर्वच मतदारसंघात वाहनांवर व अवैध वाहतुकीवर करडी नजर असून अनाधिकृतपणे पैशांची वाहतूक करण्यात येत असल्यास कारवाई केली जात आहे.
पालघरमध्ये तीन कोटींची रोकड जप्त
दरम्यान, काल देखील पालघरमध्ये पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे. पालघरमधील एका वाहनातून तीन कोटींहून अधिक रोकड जप्त करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पालघरच्या वाडा पाली मार्गावरून विक्रमगडच्या दिशेने जाणाऱ्या एका कारवर पोलिसांना संशय आला. यानंतर कार थांबवून चालकाची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान संशय वाढल्याने कार वाडा पोलिस ठाण्यात आणून तपास करण्यात आला. तपासादरम्यान कारमधून सुमारे 3 कोटी 70 लाख रुपये जप्त करण्यात आले. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
मुंबईत 2 कोटी 30 लाख रुपये सापडले
मुंबईतही 2 कोटींहून अधिक रोख रकमेसह 12 जणांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक अवैधरित्या मोठ्या प्रमाणात रोकड घेऊन जात असल्याची गुप्त माहिती एलटी मार्ग पोलिस स्टेशनला मिळाली. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत शहरातील भुलेश्वर मार्केट, काळबादेवी येथून 12 जणांना संशयावरून ताब्यात घेतले.