विधानसभा निवडणुकीची राज्यभरात सुरु आहे. प्रचाराचा जोर दिवसागणिक वाढत चालला आहे. स्थानिक पातळीवर गणितं फिरवण्याचे प्रयत्न उमेदवारांकडून सुरु आहेत. माहीम मतदारसंघावरुन शिंदेसेना आणि मनसेचे संबंध ताणले गेले.
मुंबादेवी मतदारसंघातून महायुतीकडून शिंदेसेनेच्या शायना एनसी मैदानात आहेत. त्यांच्या समोर महाविकास आघाडीच्या अमिन पटेल यांचं आव्हान आहे. ते काँग्रेसचे आमदार आहेत. २००९ पासून अमिन पटेल सातत्यानं निवडून येत आहेत. शायना एनसी मुंबादेवीच्या रहिवासी नाहीत. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक जड मानली जात आहे.
माहीममध्ये मनसे आणि शिंदेसेनेचं मेतकूट जमलं नाही. पण मुंबादेवीत मनसेनं शायना एनसींना पाठिंबा दिला आहे. कुंभारवाड्यातील राम मंदिर हॉलमध्ये शनिवारी मनसे कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यात मनसैनिकांनी महायुतीच्या उमेदवार शायना एनसी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. याबद्दल शायना यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.
राज्यात शिंदेसेना ८० जागा लढवत आहे. विशेष म्हणजे यातील १२ जागांवर एकनाथ शिंदेंनी दिलेले उमेदवार भाजपचे आहेत. विधानसभेचं तिकीट मिळवण्यासाठी १२ नेत्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. शायना एनसी याच नेत्यांपैकी एक आहेत. निवडणुकीपूर्वी भाजपमधून शिंदेसेनेत उडी घेणाऱ्या शायना एनसी यांना मनसेनं पाठिंबा दिला आहे. त्यामुळे मनसे भाजप नेत्यांच्या जागा सेफ करत असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
मुंबईत शिंदेसेना लढवत असलेल्या जवळपास सगळ्याच जागांवर मनसेनं उमेदवार दिले आहेत. केवळ दोन उमेदवारांविरोधात मनसेनं उमेदवार दिलेले नाहीत. अंधेरी पूर्वेत मुरजी पटेल आणि मुंबादेवीत शायना एनसी यांच्याविरोधात मनसेनं उमेदवार उतरवलेले नाहीत. विशेष म्हणजे हे दोन्ही नेते मूळचे भाजपचे आहेत. ते निवडणूक लढवण्यासाठी शिंदेसेनेत गेलेले आहेत.
शिंदेसेना-मनसे एक, फडणवीसांचा खास नेता सेफ? ‘उडी’ मारणाऱ्या उमेदवारासाठी राम मंदिरात बैठक
शिंदेसेनेविरोधात उमेदवार देणाऱ्या मनसेनं भाजपच्या अनेक महत्त्वाच्या नेत्यांविरोधात उमेदवार दिलेले नाहीत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विनोद शेलार, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, मिहीर कोटेचा, तमिल सेल्वन या भाजपच्या प्रमुख नेत्यांविरोधात मनसेनं उमेदवार दिलेले नाहीत.