Uddhav Thackeray: हम महाराष्ट्र को लुटेंगे और दोस्तो को बाटेंगे असं भाजपचं धोरण आहे. त्याचसाठी यांना सत्ता हवी आहे, अशा शब्दांत ठाकरेंनी भाजपला लक्ष्य केलं.
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील शिवसेनेतील बंडानंतर एकनाथ शिंदेंसोबत गेले. शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार बंडानंतर गुवाहाटीला गेलेले असताना शहाजीबापू पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. एका कार्यकर्त्यासोबत फोनवर बोलताना शहाजीबापूंनी तिथल्या परिस्थितीचं वर्णन करताना काय झाडी, काय डोंगर, काय हाटील असे शब्द वापरले होते. सांगोल्यातील ठाकरेंनी बापूंची मिमिक्री करत त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला.
रेल्वेमध्ये कोणाची ओळख आहे का? एक तिकीट हवंय. आहे का कोणाची ओळख?, असा प्रश्न ठाकरेंनी सभा सुरु असताना विचारला. ‘२३ तारखेचं एकच तिकीट पाहिजे आणि तेसुद्धा गुवाहाटीचं. म्हणजे परत जाऊ दे त्यांना. काय झाडी, काय डोंगुर.. बसा तिकडेच, झाडं मोजत बसा,’ असा टोला ठाकरेंनी शहाजीबापू पाटील यांचं नाव न घेता लगावला.
‘प्रत्येकाचं एक नशीब असतं. देव संधी देत असतो. त्या संधीचं सोनं करायचं की माती करायची हे ज्याचं त्यानं ठरवायचं. गेल्या वेळी एका गद्दाराला आपण उमेदवारी दिली. तुम्ही सगळ्यांनी त्यांना संधी दिली. आणि त्यांनी नुसतं संधीचं नाही तर आयुष्याचं मातेरं केलं. किती माज म्हणजे किती माज असावा?, अशा शब्दांत ठाकरे बापूंवर बरसले.
सांगोल्यातील सभेतून ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांनादेखील लक्ष्य केलं. महाराष्ट्राला काही स्वाभिमान आहे की नाही? मोदी, शहांनी यायचं आणि टपल्या मारुन जायचं. महाराष्ट्राला पायपुसणं समजू नका. सोलापूर, सांगली, कोल्हापूर, पुणे हा सहकाराचा पट्टा आहे. सहकारी कारखाने, बँकांची संख्या मोठी आहे. स्वातंत्र्यानंतर देशात पहिल्यांदाच सहकार खातं तयार केलं गेलं.. त्याची जबाबदारी शहांकडे दिली. आता धाडी पडतात म्हणून काही जण त्यांच्यासोबत गेले आहेत. पण त्या लोकांना भाजपची नीती माहीत नाही. वापरा आणि फेकून द्या, हेच भाजपचं धोरण आहे. आज सोबत घेतील, उद्या उपयोग संपला की फेकून देतील, असं म्हणत ठाकरेंनी तोफ डागली.