सुजय विखेंनी बोलून दाखवली मनातील सल, ‘माझे जरा काही शिजले की कोणीतरी…’

Sujay Vikhe Patil at Rahuri Vidhan Sabha : लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान फिरले आहे. माझे जरा काही शिजले की कोणीतरी भरलेल्या पातेल्याला लाथ मारते, अशी खंत सुजय विखे यांनी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र टाइम्स

अहिल्यानगर : ‘मार्चपर्यंत सर्व काही ठीक होते. मात्र, लोकसभा निवडणुकीपासून माझे ग्रहमान फिरले आहे. माझे जरा काही शिजले की कोणीतरी भरलेल्या पातेल्याला लाथ मारते,’ अशी खंत माजी खासदार डॉ. सुजय विखे यांनी व्यक्त केली आहे. मात्र जास्त काही बोलायचे नाही, वेळ आली की जे काय करायचे ते करीन, असेही विखे म्हणाले आहेत.

राहुरी तालुक्यात भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांच्या प्रचारासाठी आयोजित एका सभेत बोलताना त्यांनी संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथील सभेचा संदर्भ देत हे विधान केले. धांदरफळ येथील सभेत विखे यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ कार्यकर्ते वसंत देशमुख यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री थोरात यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. त्यामुळे विखे यांना संगमनेरमधून विधानसभेची उमेदवारी मिळू शकली नाही, असे बोलले जाते. यासंदर्भाने विखे म्हणाले, ‘माझ्या नशिबात सध्या काही तरी गडबड चालू आहे. लोकसभा निवडणुकीत मार्चपर्यंत चांगले वातावरण असताना नंतर अचानक काय झाले माहिती नाही. माझा पराभव झाला. त्यानंतर म्हटले चला आमदार होऊ. त्यासाठी संगमनेर तालुक्यात लक्ष केंद्रित केले. संगमनेरमध्येही माझ्या सभांना गर्दी पाहून सर्वांना वाटले की मी आमदार होणार. तशी चर्चा सुरू झाली. मात्र धांदरफळाच्या सभेत मध्येच वसंत देशमुखांनी उठून शिजलेल्या पातेल्याला लाथ मारली आणि तेही राहून गेले,’ अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
शरद पवारांनी पुन्हा काढला लोकसभेतील तो निर्णायक मुद्दा, अहिल्यानगरमधून भाजपवर निशाणा
कर्डिलेंना उददेशून ते म्हणाले, ‘माझे ग्राहमान लोकांसाठी काय ठीक दिसत नाही. मला बोलावू नका. तुमचे जे चालेले आहे ते ठीक आहे. मी योग्य वेळ आल्यावर जे काय करायचे ते करीन, तेवढेच माझ्यासाठी योग्य आहे,’ असेही डॉ. विखे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत अहमदनगर मतदारसंघातून पराभव झाल्यावर डॉ. विखे यांनी संगमनेरमधून तयारी सुरू केली होती. त्यासाठी जोरदार सभा सुरू होत्या. त्यातून त्यांनी थोरात यांना टार्गेट केले होते. त्याचवेळी थोरात यांच्या कन्या डॉ. जयश्री यांच्याही तालुक्यात सभा होत्या. त्यासंदर्भाने धांदरफळ येथील सभेत डॉ. विखे मंचावर असताना वसंत देशमुख यांनी डॉ. थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केले. हे प्रकरण राज्यभर गाजले. देशमुख यांना अटक आणि नंतर जामिनावर सुटकाही झाली. यावरून विखे थोरात समर्थंकामध्ये मोठा राडा झाला. जाळपोळ झाली. याचे गुन्हेही दाखल करण्यात आले. जागा वाटपाचा निर्णय तोपर्यंत प्रलंबित होता. संगमनेरच्या जागेवर विखे यांच्यासाठी भाजपचा दावा होता. मात्र, हे प्रकरण घडल्यानंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी विखे यांना उमेदवारी न देण्याचा निर्णय घेत ही जागा शिवसेना शिंदे गटाला सोडली. आता तेथे भाजपमधून शिंदे गटात प्रवेश केलेले अमोल खाताळ निवडणूक लढवित आहेत.

लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

Source link

ahmednagar politicsBJP in ahmednagarradhakrishna vikhe patilrahuri vidhan sabhasujay vikhe patilअहमदनगरमधील विखेंचे राजकारणभाजपची अहमदनगरमधील ताकदराहुरी विधानसभेतील राजकारणविधानसभा निवडणुकीची रणधुमाळीसुजय विखे पाटलांची खंत
Comments (0)
Add Comment