Maharashtra Assembly Election 2024: मुंबईतील ३६ जागांवर महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्हींकडून मिळून १२ महिलांना तिकीट मिळाले आहे. पक्षनिहाय आकडेवारी पाहता, शिवसेनेने सर्वाधिक चार महिलांना, तर काँग्रेसने केवळ एकाच महिलेला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
महिलांना राजकारणात अधिकाधिक प्रतिनिधित्व मिळावे, अशी मागणी सातत्याने होत असते. राजकीय पक्षही आपण महिलांच्या प्रश्नांवर सजग असल्याचे सातत्याने ठसवण्याचा प्रयत्न करतात. त्यातच महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजना आणल्यापासून महिलांना राजकारणात अनन्यसाधारण महत्त्व आले आहे. त्यामुळेच, महिला मतांना आपल्याकडे वळवण्यासाठी महाविकास आघाडीनेही ‘महालक्ष्मी योजने’चा समावेश जाहीरनाम्यात केला आहे.
मुंबईतील ३६ जागांवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार उभे करण्यात आले असून त्यातील सर्वाधिक २२ जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष लढवत आहे. परंतु, पक्षाकडून केवळ तीन महिलांना उमेदवारी दिली आहे. त्याखालोखाल भाजपने १७ जागांवर उमेदवार उभे केले असून त्यांनीही केवळ तीनच महिलांना उमेदवारी दिली आहे.
मात्र, उमेदवारी देण्याबाबत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने इतरांपेक्षा एक पाऊल पुढे टाकले आहे. शिंदेंना जागावाटपात मुंबईत थोडे नमते घ्यावे लागले आणि केवळ ११ जागाच पदरात पाडून घेता आल्या. तरीही पक्षाने इतरांच्या तुलनेत सर्वाधिक, चार महिलांना उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसलाही तितक्याच जागा मिळाल्या असूनही केवळ एकाच जागेवर त्यांनी महिला उमेदवाराला उमेदवारी दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागांमधून एका जागेवर, तर राष्ट्रवादी काँग्रेस-शप पक्षाला मिळालेल्या दोन जागांपैकी एकावर महिला उमेदवाराला संधी मिळाली आहे. यंदा स्वतंत्रपणे निवडणूक लढविणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबईत २६ जागांवर उमेदवार उभे केले असून त्यात तीन महिलांना उमेदवारी दिली आहे.
विविध राजकीय पक्षांच्या महिला उमेदवार
शिवसेना
सुवर्णा करंजे – विक्रोळी
मनिषा वायकर – जोगेश्वरी पूर्व
यामिनी जाधव – भायखळा
शायना एनसी – मुंबादेवी
भाजप
मनीषा चौधरी – दहिसर
विद्या ठाकूर – गोरेगाव
भारती लव्हेकर – वर्सोवा
शिवसेना उबाठा
ऋतुजा लटके – अंधेरी पूर्व
प्रविणा मोरजकर – कुर्ला
श्रध्दा जाधव – वडाळा