Chandrapur Vidhan Sabha Nivadnuk: सध्या चंद्रपुरात सासू विरुद्ध सून असं चित्र दिसत आहे. येथे खासदार प्रतिभा धानोरकर या भावासाठी प्रचाराच्या रिंगणात उतरल्या आहेत. तर, त्यांच्या विरोधात सासू वत्सला या मुलगा अनिल धानोरकर यांच्यासाठी प्रचार करत आहेत.
ऐन निवडणुकीच्या धामधूमीत दिवंगत बाळू धानोरकर यांच्या आई वत्सलाताई धानोरकर यांनी माझ्या मुलाचा घातपात झाला, अशी शंका उपस्थित करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी सून आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यावरही आरोप केले आहेत.
आपल्या मोठ्या मुलाचा प्रचार करताना त्या मतदारसंघात दिसत आहेत. त्यांच्या मोठा मुलगा अनिल धानोरकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार आहेत. ते भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष सुद्धा राहिले आहेत. त्यांनी विधानसभा लढाविण्याची तयारी केली होती. त्यामुळे निवडणुका जाहीर होण्यापूर्वी खासदार धानोरकर भावाच्या पाठीशी उभे राहतात की दिराच्या याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती.
शेवटी खासदार धानोरकर भावाचा पाठिशी उभ्या राहिल्या आहे. त्यांचे भाऊ प्रवीण काकडे काँग्रेसचे वरोरा मतदार संघातील उमेदवार आहेत. खासदार धानोरकर यांचा निर्णय त्यांच्या सासूंना पटलेला दिसत नाही. त्या नाराज आहेत. कदाचित त्यामुळे त्यांनी मोठ्या मुलाचा प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
Pratibha Dhanorkar: लढाई सासू-सुनेची; चंद्रपुरात प्रतिभा धानोरकर भावासाठी, तर सासू वत्सला या लेकासाठी आमनेसामने
सासू आणि सून एकमेकांच्या विरोधात उभ्या झाल्याचं चित्र या मतदारसंघात दिसत आहे. आता यात कोण सरस ठरले हे येत्या काही दिवसात कळणार आहे. मात्र, बाळू धानोरकर यांच्या आई प्रचारात उतरल्याने अनिल धानोरकर यांना सहानुभूती मिळत असल्याचे चित्र वरोरा मतदारसंघात दिसत आहे. विशेष म्हणजे या मतदारसंघात ठाकरे गटाचे मुकेश जिवतोडे, भाजपचे अहेतेश्याम अली यांनी बंडखोरी केलेली आहे. याचा फटका महायुती, महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.