Satara Ajit Pawar: सातारा जिल्ह्यातील फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सचिन पाटील- कांबळे यांच्या प्रचारार्थ साखरवाडी (ता. फलटण) येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जाहीर सभेचे आयोजन केले होते.
हायलाइट्स:
- विधानपरिषदेला संजीवराजेंना तिकीट देणार होतो. मात्र, रामराजेंनी विरोध केला
- संपूर्ण भाषणामध्ये “श्रीमंत” पदवीवरून उपरोधिक शाब्दिक फटकारे
- उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गौप्यस्फोट
आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांच्या हाती
फलटण तालुक्याची सर्व सूत्रे दिली. भाजपचे सरकार असतानासुद्धा त्यांना सभापती पद दिले. मात्र, त्यांनी याची जाणीव ठेवली नाही. फलटण तालुक्यातील सर्व संस्था आज अडचणीत असून, त्या श्रीमंतांनी दुसऱ्यांना चालवायला दिल्या आहेत. जर श्रीमंतांना संस्था दुसऱ्यांना चालवायला द्यायच्या असेल, तर त्यांनी आमदारकी पण सचिन पाटील यांना चालवायला द्यावी, असा उपरोधिक टोलाही लगावला.
येणाऱ्या सहा महिन्यात शेतकऱ्यांना शेती पंपांना दिवसा वीजपुरवठा करण्याचे शासनाचे नियोजन असल्याचे सांगून सरकारने महाराष्ट्रातील कांद्याची निर्यात बंदी उठवण्याचे काम केले असून शेती वीज बिल माफ केल्याचे निदर्शनास आणून दिले. पंतप्रधान मोदींनी सोलर पॅनेलसाठी विविध योजना आणल्या आहेत, तर लाडक्या बहिणीची योजना सुरूच राहणार असल्याचे सांगून विरोधक मात्र ही योजना बंद करण्यासाठी न्यायालयात गेले होते. तीन गॅस सिलेंडर मोफत दिले असून, मुलींची शालेय फी महायुती सरकारने माफ केली असल्याचे त्यांनी सांगितले.
मी दिलेला शब्द पाळत असतो. विधान परिषदेला संजीवराजे नाईक निंबाळकर यांना तिकीट देणार होतो. मात्र रामराजे नाईक निंबाळकर यांनी तिकीट देऊ दिले नाही. त्यांनी विरोध केला, मग शेखर गोरेंना उभं केलं. असा गौप्यस्फोट पवार यांनी केला. तुम्ही स्वतःच्या राजकीय कारकीर्दीमध्ये स्पर्धक तयार होऊ दिले नाही. फलटण बाजार समिती शिवरूपराजे खर्डेकर चेअरमन असताना समिती चांगली चालवत होते. मात्र, हे आपल्याला स्पर्धक होऊ शकतात म्हणून त्यांना डावलून घरात चेअरमनपद दिले.
बारामतीमध्ये आम्ही सर्व सहकारी संस्था प्रगतीपथावर नेल्या असून एकही संस्था आम्ही श्रीमंताप्रमाणे चालवायला दिलेल्या नाही. आम्ही मोठ्या प्रमाणात दर्जेदार विकासकामे बारामतीत केली आहेत. आज विधानसभा निवडणुकीला श्रीमंत दारे बंद करून बैठका घेताहेत. दीपक चव्हाण यांच्या प्रचाराला जावा मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे राहता. आमदारकी पण टिकवायची आणि विरोधात प्रचार करायचा हे योग्य नाही, असे असा सज्जड दमही पवार यांनी दिला.
रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचे विरोधक त्यांच्याबाबत फेक नरेटिव्ह सेट करत आहेत. इतके दिवस श्रीमंतांचं ऐकलं, आता अजित पवाराचं ऐका. फलटणमधून सचिन पाटलांना विजयी करा, असं आवाहन अजित पवारांनी केलं आहे. सातारा जिल्हा बँकेची भरती असून 300 जागा आहेत. ती ऑनलाईन पद्धतीने भरती आहे, मात्र काही जण तुम्ही मला राजकारणात मदत करा. तुम्हाला चिटकवतो असा चुकीचा प्रचार करत असल्याचे पवार यांनी रामराजे यांचे नाव न घेता सांगतानाच या भरती प्रक्रियेला कोणी फसू नका, असे आवाहन अजित पवार यांनी केले. यावेळी अजित पवार यांनी “श्रीमंत” पदवीवरून अनेक वेळा उपरोधिक टीका करीत पदवीचा विनोदी शैलीत समाचार घेतला.