Mumbai Gokhale Bridge: महापालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्यांचे काम ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र या कामांनादेखिल विलंब होण्याची शक्यता आहे. काम होताच गोखले पुलाचा हा शेवटचा भाग असलेल्या पूर्व ते पश्चिम मार्ग सुरू होणे शक्य होणार आहे.
अंधेरी पूर्व आणि पश्चिम दिशेच्या वाहतुकीदरम्यान महत्त्वाचा दुवा असलेल्या गोखले पुलाच्या पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले आहे. पुलाचा हा भाग २६ फेब्रुवारीपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. त्यावरून हलक्या वाहनांना जाण्याची परवानगी आहे. आता या पूल उभारणीतील महत्त्वाचा व दुसरा टप्पा म्हणजे दुसरा गर्डर स्थापन करण्याचे काम सुरू करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून ४ सप्टेंबर २०२४ ला गर्डर रेल्वे भागावर २५ मीटरपर्यंत सरकविण्याचे कामकाज यशस्वीपणे पूर्ण केले. महाकाय असा गर्डर एकूण ८६ मीटर सरकविणे आवश्यक असते. त्यामुळे उर्वरित कामही नुकतेच पूर्ण करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेतील सूत्रांनी दिली.
आता दुसरा गर्डर हा रेल्वे रुळांपासून १४ मीटर उंचीपर्यंत आणणे यासह अन्य महत्वाची तांत्रिक कामे पार पाडावी लागणार आहेत. २६ फेब्रुवारी २०२४ ला गोखले पुलाचा एक टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्यातील स्थापित असलेल्या गर्डरच्या समान पातळीवरच दुसऱ्या टप्प्यातील गर्डर आणणे गरजेचे आहे. ही कामे करण्यासाठी भल्यामोठ्या क्रेनची आणि ती क्रेन ठेवण्यासाठी जागेची गरज मुंबई महापालिकेला आणि कंत्राटदाराला आहे. त्यासाठी अंधेरी पश्चिमेला असलेल्या टाटा कंपनीच्या जागेची चाचपणी केली. मात्र आता कंत्राटदाराकडून उपलब्ध होणारी क्रेन विलंबाने दाखल झाली आहे.
उद्यान विभागाची हरकत
ही क्रेन उभी करण्यासह अन्य कामासाठी त्या भागातील काही झाडांवरही कुऱ्हाड येणार होती. त्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभागाची परवानगी घेणे आवश्यक असते. ही परवानगी मिळण्यासाठीही विलंब झाला. त्यातच झाडे तोडल्यानंतर नियमानुसार २० दिवस त्या ठिकाणी कोणतेही काम करण्यास उद्यान विभागाने मनाई केली आहे. या सर्व कारणांमुळे रेल्वे हद्दीतील गर्डरचे काम पूर्ण होण्यासाठी १४ नोव्हेंबरची अंतिम मुदत हुकल्याचे सूत्रांनी सांगितले. नोव्हेंबरअखेरपर्यंत किंवा डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ही कामे पूर्ण होतील. महापालिकेच्या हद्दीतील पोहोच रस्त्यांचे काम ३० एप्रिल २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे. मात्र या कामांनादेखिल विलंब होण्याची शक्यता आहे. काम होताच गोखले पुलाचा हा शेवटचा भाग असलेल्या पूर्व ते पश्चिम मार्ग सुरू होणे शक्य होणार आहे.