Solapur South Assembly Constituency Dilip Mane : पक्षाकडे उमेदवारी मागितली, मात्र डावललं गेलं. त्यानंतर माजी आमदाराने अपक्ष अर्ज दाखल केला, मात्र तोदेखील मागे घ्यायला लावला. आता मतदानाआधी त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचचं लक्ष लागलं आहे.
‘वरीष्ठ पातळीवरील समन्वयाच्या अभावामुळे आपल्या वाट्याला अकारण उपेक्षा आली आहे,’ अशी शब्दांत माने यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दिलीप मानेंना उमेदवारी जाहीर होऊनही पक्षाचा एबी फार्म मिळाला नाही. निराश झालेले दिलीप माने यांनी शेवटच्या दिवशी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अपक्ष उमेदवारी अर्जही वरिष्ठांच्या सूचनेनुसार माघारी घ्यावा लागला.
पत्राच्या माध्यमातून दिलीप मानेंचा संवाद
सोलापूर जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघात दक्षिण सोलापूर मतदार संघ अतिशय महत्वाचा मानला जातो. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापूर मतदारसंघातून माजी आमदार दिलीप माने महाविकास आघाडीकडून इच्छुक होते. मात्र, आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे गेला, त्यामुळे माने यांच्या पदरी निराशा पडली आहे. महाविकास आघाडीच्या धर्मानुसार माने यांना अपक्ष भरलेला उमेदवारी अर्जही मागे घ्यावा लागला. त्यानंतर राजकीय घडामोडींपासून लांब असलेले माने यांनी पत्राच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे.
दिलीप माने काय निर्णय घेणार, सोलापूरकरांचे लक्ष
माजी आमदार आणि काँग्रेसचे नेते दिलीप माने सोलापुरातील दिग्गज नेत्यांपैकी आहेत. अपक्ष उमेदवारी अर्ज भरून दांडगे दंड थोपटणारे दिलीप माने यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ का आली? याचे गूढ अद्यापही गुलदस्त्यातच आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोलापूर दौरा आहे. त्यामुळे दिलीप माने यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी आमदाराच्या भावनिक पत्राने मतदारसंघातील वातावरण टाईट; मतदानाच्या आधी घेणार निर्णय
रविवारी उत्तर सोलापूर तालुक्यातील माने समर्थक कार्यकर्त्यांनी बँकेच्या कार्यालयात मालकांची भेट घेतली. प्रत्येकाने “मालक काय करायचे सांगा, तुम्ही सांगाल ते धोरण” असा सूर यावेळी निघाला. दिलीप माने यांनी कार्यकर्त्यांना दोन दिवस थांबा निर्णय घेतो, असे सांगून शांत केले.