Chhatrapati Sambhajinagar News: जिल्ह्यातील लोकसंख्येचा विचार करता, प्रत्येक घरात एक किंवा दोन दुचाकी वाहने असल्याची माहिती दुचाकीच्या आकडेवारीवरून समोर येत आहे.
शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या नावाने सध्या स्मार्ट बस आणि रिक्षा हे दोन पर्याय उपलब्ध आहेत. स्मार्ट सिटीच्या बस चालविण्यात येत आहे. मात्र, शहराची लोकसंख्या पाहाता सध्याही बससेवा अपुरी आहे, असे चित्र दिसते. यामुळे काही वर्षांत दुचाकीची संख्या वाढत चालली आहे. सध्या पेट्रोल इंधनावर विक्री होणाऱ्या गाड्यांची मागणी तशीच कायम आहे. यात काही प्रमाणात वाढ झालेली आहे. बाजारात इलेक्ट्रिक दुचाकी विक्रीसाठी उपलब्ध झालेल्या आहेत. मात्रई-बाकला अजूनही त्या प्रमाणात मागणी नाही; मात्र ई-स्कूटरची मागणी वाढली आहे.
‘मोपेड’ प्रकारात आतापर्यंत जिल्ह्यात १२ हजार ६६ वाहनांची विक्रीची नोंद झाल्याची माहिती – समोर आली आहे. ‘आरटीओ’कडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, जिल्हयात एकुण दुचाकी वाहनांची संख्या नऊ लाख ९४ हजार ५८ पोहोचली आहे. या वाहनांमध्ये सर्वाधिक म्हणजे ९५ टक्क्यांपर्यंत वाहने पेट्रोलवर चालणाऱ्या दुचाकी आणि मोपेड आहेत. ही संख्या आणखी वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्याचा परिणाम शहरातील वाहतुकीवरही दिसेल, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.
पेट्रोल, एलपीजीवरील वाहने
बाजारात विविध कंपन्यांनी विविध इंधनावर चालणारी वाहने तयार केली आहे. यात सीएनजीवर चालणारी दुचाकीही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. सीएनजीसह पेट्रोल-एलपीजी इंधनावर चालणारी वाहनांचीही विक्री होत आहे. यात शासनाकडून मान्यता प्राप्त किट बसवून ही वाहने ‘आरटीओ’कडून मंजूर करून घेण्यात येत आहे. पेट्रोल-एलपीजीवर ग्राहकांचा पूर्ण विश्वास बसला नसल्याने, त्याची विक्री अजून कमी आहे. जिल्ह्यात तीन वाहनांची आतापर्यंत विक्री झालेली आहे. ही वाहने प्रायोगिक तत्त्वावर असल्याची माहिती ‘आरटीओ’कडून देण्यात आली आहे.
शहरात डिझेलच्या गाड्याही
वर्ष १९८० ते ९० च्या काळात जावा, येझदी किंवा बुलेटसह यामाहा, राजदुत किंवा अन्य वाहने बाजारात होती. याशिवाय बजाजही स्कुटरमध्ये बजाज कब, सुपर आणि इतर वाहनेही विक्रीसाठी होती. यातील काही वाहने ही पेट्रोल आणि रॉकेलवरही चालविण्यात येत होती. ही वाहने त्या काळात अनेकांनी वापरलेली आहे. या वाहनांची त्या काळामध्ये खूप चलती होती. आता येणारी वाहने ही ज्या इंधन प्रकारातील इंजिन आहे. त्याच्यावरच चालत आहेत. याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी बीएस मानांकन ठरल्याने, त्यानुसार गाड्या बाजारात विक्रीसाठी येत आहे. जुन्या काळातील काही गाड्या अजूनही काही ग्राहकांनी तसेच त्यांच्या कुटुंबीयांनी सांभाळून ठेवले आहे. यातील डिझेल प्रकारातील गाड्यांचा समावेश आहे. या गाड्यांची नोंदीही असल्याची माहिती ‘आरटीओ’ने दिली आहे.