Maharashtra Assembly Election 2024: पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे तिघेही आज, मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत.
पंतप्रधान मोदी यांची पहिली प्रचारसभा दुपारी १२ वाजता चिमूरमध्ये पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी चार वाजता सोलापूर येथे मोदी भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा घेतील. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता पुण्यात मोदींचा रोड शो होईल. पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात सभा घेतल्यानंतर आता भाजप नेते अमित शहा मुंबईत भाजप उमेदवारांसाठी दोन सभा घेणार आहेत. शहा यांची पहिली प्रचारसभा संध्याकाळी सहा वाजता घाटकोपरच्या जनरल अरुणकुमार वैद्य उद्यान येथे होईल. तर दुसरी सभा कांदिवलीच्या कमलाविहार स्पोर्ट्स क्लबसमोर होईल.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची अकोला, अमरावती आणि नागपूर येथे भाजप उमेदवारांसाठी प्रचारसभा घेणार आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही सकाळी साडेनऊ वाजता विशेष विमानाने छत्रपती संभाजीनगरमध्ये आगमन होईल. तिथून ते हेलिकॉप्टरने चिखली येथे पोहोचतील. दुपारी १२ वाजता काँग्रेस उमेदवार राहुल बोन्द्रे आणि दिलीप सानंदा यांच्या प्रचारासाठी राहुल गांधी प्रचारसभेत संबोधित करतील. त्यानंतर दुपारी ३ वाजून ३० मिनिटांनी ते गोंदिया येथे काँग्रेस उमेदवार गोपालदास अग्रवाल यांच्यासाठी प्रचारसभा घेतील. संध्याकाळी राहुल गांधी गोंदियाहून दिल्लीसाठी निघतील.
राहुल गांधी यांनी याआधी ६ नोव्हेंबरला महाराष्ट्रात येऊन नागपूर येथे संविधान संमेलनाला संबोधित केले होते. त्यानंतर संध्याकाळी वांद्रे कुर्ला संकुलात आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेत राहुल गांधी यांनी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत आघाडीच्या पाच हमी जाहीर केल्या होत्या.