Pune News : कमावत्या पत्नीला पोटगी मिळणार नाही, कौटुंबिक न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्र टाइम्स | Updated: 12 Nov 2024, 7:49 am

पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने एका ४६ वर्षीय महिलेचा अंतरिम पोटगीचा अर्ज फेटाळला आहे. पत्नी शिक्षिका असून स्वतः कमावती असल्याचे तसेच दोन्ही मुले प्रौढ असल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले. विशेष म्हणजे, धाकट्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च वडील स्वतःच करत असल्याचे समोर आले. त्यामुळे न्यायालयाने पत्नीचा अर्ज फेटाळला .

महाराष्ट्र टाइम्स

पुणे : पत्नी कमावती असून, दोन्ही मुले सज्ञान आहेत; तसेच धाकट्या मुलाचे शैक्षणिक शुल्क वडिलांनीच भरल्याचे आढळून आल्याने ४६ वर्षीय पत्नीने अंतरिम पोटगी मिळण्यासाठी पतीविरोधात केलेला अर्ज पुण्याच्या कौटुंबिक न्यायालयाने फेटाळला. न्यायाधीश एस. एन. रुक्मे यांनी हा आदेश दिला. या प्रकरणी लग्नाला २५ वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर पत्नीने कौटुंबिक हिंसाचार कायदा आणि हिंदू विवाह कायद्यानुसार घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. विशेष म्हणजे दोघेही एकाच छताखाली राहात आहेत.

सुरेश आणि प्रिया (दोघांची नावे बदलली आहेत) यांचा विवाह डिसेंबर १९९७ मध्ये झाला. दोघांना २५ आणि १७ वर्षांची मुले आहेत. पतीकडून शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास होत असल्याने जगणे कठीण झाल्याचा आरोप करीत पत्नीने कौटुंबिक हिंसाचार कायदा व हिंदू विवाह कायद्याच्या तरतुदींनुसार घटस्फोट मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्याचा निकाल येण्यास वेळ लागणार असल्याने अंतरिम पोटगी मिळावी, असा अर्जही पत्नीने न्यायालयात केला.

‘आपण शाळेत शिक्षिका असून, दरमहा सात हजार रुपये पगार मिळतो. या तुटपुंज्या पगारात मुलांच्या शाळेची, शिकवणीची फी भरावी लागते. धाकट्या मुलाची शिकवणीची वार्षिक फी ८६ हजार रुपये असून, वडिलांकडून उसने पैसे घेऊन ती मिळते. त्यामुळे आपल्याला दरमहा २५ हजार रुपये अंतरिम पोटगी मिळावी,’ अशी विनंती पत्नीने अर्जाद्वारे केली होती. पतीच्या वतीने अॅड. विकास मुसळे यांनी अर्जास आक्षेप घेतला.

‘दोन्ही मुले सज्ञान असून, थोरला मुलगा नोकरी करीत आहे. धाकट्या मुलाचे शैक्षणिक शुल्क आपण भरले आहे. पत्नी कमावती असून, ती खासगी शिकवणीतून दरमहा ६० ते ६५ हजार रुपये मिळविते. आपले उत्पन्न त्यापेक्षा कमी आहे,’ असा युक्तिवाद अॅड. मुसळे यांनी केला. याशिवाय पतीने भरलेले प्राप्तिकर विवरणपत्रही त्यांजी न्यायालयात सादर केले. ही वस्तुस्थिती पत्नीने नाकारली नाही, असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने पोटगी मिळण्यासाठी पत्नीने केलेला अर्ज फेटाळला.

Source link

alimonyfamily courtPune newsकमावत्या पत्नीला पोटगी नाहीकौटुंबिक न्यायालयपोटगीचा अर्ज फेटाळला
Comments (0)
Add Comment