Maharashtra Assembly Elections 2024: ‘आपल्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघामध्ये कुणी निवडणुकीत उभे राहता कामा नये, असा टोलाच विरोधकांना लगावताना निवडणुकीत गाफील राहू नका’, असे वागळे इस्टेट येथे प्रचाररथावरून बोलताना शिंदे यांनी नागरिकांना सांगितले
‘आपल्या कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघामध्ये कुणी निवडणुकीत उभे राहता कामा नये, असा टोलाच विरोधकांना लगावताना निवडणुकीत गाफील राहू नका’, असे वागळे इस्टेट येथे प्रचाररथावरून बोलताना शिंदे यांनी नागरिकांना सांगितले. यावेळी शिंदे यांनी त्यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात प्रचाररॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्शन केले. रविवारचा मुहूर्त साधत मुख्यमंत्री शिंदे यांनी मतदारसंघातून भव्य रॅली काढली. वागळे इस्टेट येथील आयटीआय परिसरातून दुपारी रॅली सुरू झाली. यावेळी रस्त्याच्या दुतर्फा उभ्या नागरिकांना शिंदे यांनी संबोधित केले. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत खोडा घालण्यासाठी आलेल्या सावत्र भावांना जोडा दाखवा, ते ही योजना बंद पाडण्यासाठी न्यायालयात गेले’, असे टीकास्त्र शिंदे यांनी सोडले. ‘निवडणुकीत त्यांना त्यांची जागा दाखवा, जाब विचारा’, असेही ते म्हणाले. ‘विरोधक देणारे नसून घेणारे आहेत. आपण देना बँक आहोत, ते लेना बैंक आहेत’, अशी टीका शिंदे यांनी केली. अडीच वर्षे जे घरात बसले, त्यांना कायमचे घरी बसवा, असेही शिंदे म्हणाले.
यावेळी शिवसेना खासदार नरेश म्हस्के, भाजप आमदार निरंजन डावखरे, माजी महापौर अशोक वैती, मीनाक्षी शिंदे, माजी नगरसेवक विकास रेपाळे, नम्रता भोसले, एकनाथ भोईर, भाजप ठाणे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्यासह महायुती व घटक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
जेसीबीमधून पुष्पवृष्टी, कुटुंबीयांचीही हजेरी
शिंदे यांच्या भगव्या प्रचाररथावर जागोजागी जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. शिंदे यांनी नातू रुद्रांश यालाही सोबत घेत त्याला रॅली दाखवली. महिलांकडून शिंदे यांना औक्षण करण्यात आले. तर शिंदे यांच्या स्नुषा वृषाली शिंदे दुचाकीवरून रॅलीत सहभागी झाल्या. वागळे इस्टेट येथून इंदिरानगर, सावरकर नगर, यशोधन नगर, आईमाता मंदिर, कामगार हॉस्पिटल, काजूवाडी, लुईसवाडी, हाजूरी, रघुनाथ नगर, परबवाडी, कोपरी या मार्गे झालेल्या या रॅलीत शिंदे यांचे जागोजागी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे स्वागत केले.
लाडक्या बहिणींना आवाहन
‘लाडकी बहीण’ योजनेचा आपल्या मतदारसंघातील एक लाख २० हजार महिलांनी लाभ घेतला. त्यामुळे एक लाख २० हजार बहिणी, तितकेच भावोजी म्हणजे विरोधकांचे झाले डिपॉझिट गुल, अशी मिश्किल टिप्पणी शिंदे यांनी केली. सकाळी पहिले जोडीने मतदान करा, असे सांगताना या योजना सुरू ठेवायच्या व वाढवायच्या असतील, तर पुन्हा कोणाच्या हातात सत्ता देणार तुम्ही, असा प्रश्न शिंदे यांनी विचारला. त्यासाठी तुम्ही एकनाथ शिंदे बनून काम करायचे आहे, असे शिंदे यांनी सांगितले.