Nandgaon Assembly constituency : विधानसभा निवडणुकीत नांदगावचा पाणीप्रश्न हा नेहमीचा मुद्दा असतो. मात्र, यंदा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली जात असल्याचे चित्र आहे. यंदा शिवसेनेकडून कांदे, ठाकरे गटाकडून गणेश धात्रक, अपक्ष म्हणून समीर भुजबळ, डॉ. रोहन बोरसे यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात आहेत.
२००९ व २०१४ मध्ये भुजबळ पर्व अवतरले व पंकज यांनी सलग दोनदा आमदारकी मिळवण्याचा इतिहास घडवला. मात्र, त्यांची हॅटट्रिक शिवसेनेच्या सुहास कांदेंनी रोखत हा गड पुन्हा पक्षाकडे खेचून आणला. विधानसभा निवडणुकीत नांदगावचा पाणीप्रश्न हा नेहमीचा मुद्दा असतो. मात्र, यंदा विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढली जात असल्याचे चित्र आहे. यंदा शिवसेनेकडून कांदे, ठाकरे गटाकडून गणेश धात्रक, अपक्ष म्हणून समीर भुजबळ, डॉ. रोहन बोरसे यांच्यासह १४ उमेदवार रिंगणात आहेत. कांदे यांनी करंजवण पाणी योजना मंजूर करून मनमाडचा ६० वर्षांपासूनचा प्रलंबित पाणी प्रश्न सोडविण्याचा दावा केला आहे. शिवाय नांदगावसाठी ७२ खेडी योजना, औद्योगिक वसाहतीसाठी निधी आणल्याचा दावा केला जात आहे.
ठाकरे गटाचे धात्रक पाणी योजनेच्या कामात आपलेही प्रयत्न असल्याचे सांगतात. तालुका भ्रष्टाचार व भयमुक्त करण्यासाठी आपली दावेदारी असल्याचीही त्यांची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा राजीनामा देऊन नांदगावमध्ये डेरेदाखल झालेल्या समीर भुजबळ यांच्या अपक्ष उमेदवारीने निवडणूक चुरशीची झाली आहे. त्यातच वैद्यकीय सेवेचा राजीनामा देऊन अपक्ष लढणाऱ्या डॉ. रोहन बोरसे किती मते घेतात, यावरही निकाल अवलंबून असेल. लोकसभा निवडणुकीत केंद्र सरकारविरोधी वातावरण असताना कांदे यांनी माजी मंत्री डॉ. भारती पवार यांना नांदगाव मतदारसंघातून ४० हजार मतांची आघाडी मिळवून दिली होती. मात्र, मनमाड येथे शरद पवार यांच्या सभेने भारती पवार यांची आघाडी घटवली. या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक कांदे एकतर्फी जिंकतील असे आडाखे बांधले जात असताना भुजबळ यांच्या प्रवेशाने लढतीत चुरस निर्माण झाली.
कांदे, भुजबळ, धात्रक, बोरसे अशी चौरंगी लढत होण्याची शक्यता वाढली आहे. नांदगावमध्ये मराठा समाजाची लाखावर मते आहेत. या मतांचा फायदा डॉ. बोरसे यांना होऊ शकतो. मनोज जरांगे यांनी पाठिंबा न दिल्याने बोरसे समर्थकांच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नसल्या, तरी या मतांची विभागणी निर्णायक ठरेल. डॉ. बोरसे यांनी करोनाकाळात केलेले मोठे काम त्यांचा प्लस पॉइंट आहे. मात्र, त्यांना प्रचारात इतर मराठा नेत्यांची कशी साथ मिळते, यावर पुढचे समीकरण अवलंबून आहे. कांदे यांनी केलेल्या विकासकामांना मतदार साथ देतात, अपक्ष समीर भुजबळांच्या भुजांत बळ भरतात, ठाकरे गटाच्या गणेश धात्रक यांच्या परिवर्तनाच्या हाकेला साद देतात की रोहन बोरसेना संधी देतात, हे पाहणे रंजक आहे.
कळीचे मुद्दे…
■पिण्यासाठी, सिंचनासाठी लागणाऱ्या पाण्याची समस्या
■ औद्योगिक वसाहत नसल्याने बेरोजगारी कायम
■ गोदावरी एक्स्प्रेसचा प्रश्न दुष्काळमुक्तीसाठी ठोस प्रयत्नांची गरज
२०१९ विधानसभेत मिळालेली मते
सुहास कांदे ८४,९४८
पंकज भुजबळ ७०,९७१
राजेंद्र पगारे १३,५९५
नांदगाव विधानसभा
एकूण मतदार ३,४३,०५६
पुरुष १,७९,२४९
स्त्रिया १,६३, ८०३
इतर ४