Uddhav Thackeray: शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी सलग दुसऱ्या दिवशी करण्यात आली आहे. ठाकरेंनी बॅगांची तपासणी सुरु असतानाचा व्हिडीओ पुन्हा शेअर केला आहे. यानंतर आता लातूरमधून ठाकरेंच्या हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी नाकारली आहे.
शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज लातूर दौऱ्यावर आहेत. औसामधील हेलिपॅडवरुन ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली. काल यवतमाळच्या वणीतही ठाकरेंच्या बॅगा तपासण्यात आल्या होत्या. सलग दुसऱ्या दिवशी बॅगांची तपासणी करण्यात आल्यानंतर ठाकरेंचा संताप पाहायला मिळाला. यावेळी ठाकरेंनी निवडणूक अधिकाऱ्यांवर, कर्मचाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. तुमची नियुक्तीपत्रं दाखवा, अशा सूचनाच ठाकरेंनी केल्या.
हेलिपॅडवर बॅगांची तपासणी झाल्यानंतर आता ठाकरेंच्या हेलिकॉप्टरला उड्डाणाची परवानगी नाकारण्यात आली आहे. ठाकरे लातूरमध्ये आहेत. तिथून त्यांना धाराशिवमधील उमरग्याला पुढील सभेसाठी जायचं आहे. पण त्यांच्या हेलिकॉप्टरला अद्याप उड्डाणास परवानगीच देण्यात आलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोलापुरात थोड्याच वेळात येणार आहेत. त्यांच्या सुरक्षेच्या कारणास्तव हवाई वाहतुकीवर निर्बंध आणण्यात आले आहेत.
पंतप्रधान मोदींचं विमान लँड होईपर्यंत बाकीची उड्डाणं रोखण्यात आलेली आहेत. त्याचा फटका उद्धव ठाकरेंना बसला आहे. हवाई वाहतूक नियंत्रण कक्षानं परवानगी ठाकरेंच्या हेलिकॉप्टरच्या टेक ऑफला अद्याप परवानगी दिलेली नाही. टेक ऑफ रखडल्यानं ठाकरेंचा खोळंबा झाला आहे. त्यामुळे त्यांच्या पुढील सभेला उशीर होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आज राज्यात तीन सभा होत आहेत. विदर्भातील चिमूरमध्ये दुपारी १ वाजता मोदींची सभा झाली. त्यानंतर आता सोलापुरात मोदींची सभा सुरु झालेली आहे. संध्याकाळी साडे सहा वाजता मोदी पुण्यात असणार आहेत. लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रात भाजपचं मोठं नुकसान झालं. सातारा, पुण्याची जागा वगळता अन्य जागांवर भाजपचा पराभव झाला. त्यामुळे यंदा भाजपनं पश्चिम महाराष्ट्राकडे विशेष लक्ष केंद्रीत केलं आहे. सोलापूर, पुण्यात सभा घेत मोदी पश्चिम महाराष्ट्रात महायुतीचा झंझावाती प्रचार करताना दिसत आहेत. पश्चिम महाराष्ट्रात विधानसभेच्या ७० जागा आहेत.