Ajit Pawar Allegation On Sharad Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका मुलाखतीत शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. राज्यात ५ वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार होती आणि त्यासाठी झालेल्या बैठकीत गौतम अदानी देखील उपस्थित होते.
निवडणुकीचा अर्ज भरताना अजित पवारांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी त्याची नक्कल करून दाखवली होती. बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होत असून चक्क शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार देखील प्रचार करत आहेत. काही दिवसांपूर्वी पुण्यात आलेल्या सभेत सुप्रिया सुळे यांनी देखील अतिशय आक्रमक भाषण करत अजित पवारांना सुनावले होते. अशाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका मुलाखतीत मोठे गौप्यस्फोट केले आहेत.
एका मुलाखतीत अजित पवारांनी २०१९च्या निवडणुकीनंतर झालेल्या घडामोडींवर भाष्य केले. भाजपला पाठिंबा देण्यावरून विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अजितदादा म्हणाले, तुम्हाला माहिती नाही.जे काही झाले होते ते सर्वांना माहिती आहे. या घटनेला ५ वर्ष झाली. काय घडले होते, कोणासोबत आणि कुठे बैठक झाली आणि त्यात कोण कोण उपस्थित होते. तेव्हा झालेल्या बैठकीसाठी शरद पवार, अमित शहा, गौतम अदानी, प्रफुल्ल पटेल, देवेंद्र फडणवीस आणि मी स्वत:होतो. आमचे नेते शरद पवार होते. ते जे म्हणतील त्यानुसार आम्ही गोष्टी केल्या. फडणवीस आणि अजित पवार यांचे सरकार टीकले नाही कारण पवारांनी पाठिंबा दिला नाही. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले.
राज्यात दीड वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांसह काही आमदार भाजपसोबत गेले. तेव्हा शरद पवार का आले नाहीत तुमच्या सोबत या प्रश्नावर अजितदादा म्हणाले, शरद पवार हे असे नेते आहेत की त्यांच्या मनात काय चालले आहे हे जगातील एकही व्यक्ती ओळखू शकत नाही. मी देखील नाही. माझ्या काकू देखील नाही, आमची सुप्रिया देखील नाही.
२०१९च्या निवडणुकीच्या निकालानंतर जेव्हा भाजप आणि शिवसेना यांच्यात मतभेद झाले तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत सरकार स्थापन करणार होते असा दावा अजित पवारांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या काळात केल्याने आता याला शरद पवार आणि त्यांच्या गटाकडून काय आणि कसे उत्तर दिले जाते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.