PM Narendra Modi in Pune: लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुण्यात सभा घेत शरद पवारांवर तोफ डागली होती. पवारांचा उल्लेख मोदींनी भटकती आत्मा असा केला होता.
पुणे जिल्ह्यातील महायुतीच्या २१ उमेदवारांसाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील एस पी कॉलेज ग्राउंड वर मोठी सभा घेतली. या सभेसाठी महायुतीचे सर्वच उमेदवार हजर होते. पुण्यातल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. यामध्ये विशेषतः शरद पवार यांच्या होमग्राउंड वर येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवारांवर काय बोलणार याची मोठी उत्सुकता लागलेली होती. लोकसभेवेळी शरद पवारांना भटकती आत्मा म्हणणारे मोदी यावेळी काय बोलणार, असा प्रश्न अनेकांना पडला होता.
मात्र नरेंद्र मोदी यांनी महाविकास आघाडीतील इतर दोन पक्ष म्हणजेच काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यावर सडकून टीका केली. पण शरद पवार यांच्याबद्दल नरेंद्र मोदीच्या संपूर्ण भाषणात एक शब्दही नव्हता. त्यामुळे मोदी पुण्यात आले आणि शरद पवारांबद्दल ब्रदेखील न काढता निघून गेले, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
पुण्यातील सभेमध्ये बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदींवर काँग्रेसवर सडकून टीका केली. काँग्रेस आणि त्यांच्यासारख्या पक्षांनी नेहमीच महाराष्ट्राचा अपमान केला आहे. ही भूमी छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. काँग्रेस आणि त्यांचे मित्रपक्ष हे औरंगजेबाच्या गोष्टी करतात. वीर सावरकरांवर टीका करतात. तुमच्यात हिंमत असेल तर वीर सावरकर आणि बाळासाहेब ठाकरे यांचं कौतुक राहुल गांधी यांना करायला सांगा, असं थेट आव्हान मोदींनी दिलं. काँग्रेस असा पक्ष आहे ज्यांच्याकडे नियत नीती आणि नैतिकता यापैकी कोणतीच गोष्ट नाही. फक्त त्यांना सत्ता हवी आहे, असं मोदी म्हणाले.
काँग्रेसनं सत्तेसाठी देशाला फक्त तोडण्याचं काम केलं आहे. आता तीच काँग्रेस सत्तेसाठी दलित, मागासवर्गीय आणि आदिवासींना तोडण्याचं आणि विभागण्याचा खेळ करत आहे. एससी, एसटी आणि ओबीसीला वेगवेगळ्या जातींमध्ये वाटून त्यांची ऐकी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. काँग्रेस एससी, एसटी आणि ओबीसीसह वेगवेगळ्या जातींना आपापसात भिडवण्याचं काम करत आहे. त्यातून या जातींना कमजोर करून त्यांच आरक्षण काढून घेण्याचा काँग्रेसचा डाव असल्याचा आरोप मोदींनी केला. त्यामुळे आपण एक राहू तरच सेफ राहू असा नारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.
PM Modi in Pune: मोदींची पुण्यात सभा, विरोधकांवर तुफान हल्ला; ‘तो’ विषय टाळला, अजितदादांचा जीव भांड्यात पडला
काँग्रेस आणि ठाकरे गटावर तुफान हल्ला चढवताना शरद पवार यांच्यावर मात्र मोदींनी चकार शब्द काढला नाही. त्यामुळे मंचावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुटकेचा निश्वास टाकला, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर केलेल्या टिकेचा सर्वाधिक फटका हा अजित पवारांच्या राष्ट्रवादीलाच बसल्याचं विश्लेषण राजकीय जाणकारांनी त्यावेळेस केलं होतं. मात्र आता नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर टीका न केल्याने देखील याची चर्चा आता राज्यभरात रंगायला सुरुवात झाली आहे.