Rajan Shirodkar: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी नेते राजन शिरोडकर यांचं आज निधन झालं. ते गेल्या काही काळापासून आजारी होते. शिरोडकर हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निकटवर्तीयांपैकी एक मानले जातात.
राज ठाकरेंनी २००६ मध्ये शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी मनसेची स्थापना केली. त्यावेळी राजन शिरोडकर राज यांच्या साथीला होते. मनसेच्या स्थापनेत त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. त्यावेळी ते राज यांचे अतिशय जवळचे सहकारी होते. पण तीन वर्षांपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतही राजन शिरोडकर यांनी काम केलं.
१९९५ मध्ये राज्यात पहिल्यांदाच युतीचं सरकार आलं. त्यावेळी राजन शिरोडकर यांच्याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचं अध्यक्षपद देण्यात आलं होतं. राजन शिरोडकर यांच्या निधनानं शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांवर, कार्यकर्त्यांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
राजन शिरोडकर यांच्या निधनानंतर आदित्य ठाकरेंनी त्यांची आजची सभा रद्द केली आहे. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख आदित्य शिरोडकर यांचे वडील राजन शिरोडकर यांचं आज अल्पशा आजारानं निधन झालं. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची दादर पश्चिम कुंभारवाडा येथे आज सायंकाळी होणारी सभा रद्द करण्यात आली असून ती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आलेली आहे.
राजन शिरोडकर यांच्याप्रमाणेच त्यांचे पुत्र आदित्य शिरोडकरही मनसेत कार्यरत होते. मनसेच्या विद्यार्थी सेनेत ते सक्रिय होते. मात्र त्यानंतर त्यांनी राज यांची साथ सोडत शिवसेनेत प्रवेश केला. राजन शिरोडकर यांच्यावर दादर येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.