Muslim Candiates In Vidhan Sabha Elections : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांसाठी मुस्लीम उमेदवारांची संख्या किती आहे? याची आकडेवारी समोर आली आहे. राज्यात २८८ जागांवर कोणत्या पक्षाने किती उमेदवार दिले?
निवडणूक विभागाच्या आकडेवारीनुसार, उमेदवारांमध्ये मुस्लीम उमेदवारांचं प्रतिनिधित्व खूपच कमी असल्याचं आकडेवारीत समोर आलं आहे. एकूण उमेदवारांच्या आकड्यांनुसार, ही टक्केवारी केवळ १० टक्के आहे. २८८ मतदारसंघात एकूण ४१३६ उमेदवार आहेत. त्यापैकी ४२० मुस्लीम उमेदवार आहेत. यापैकी निम्म्याहून अधिक उमेदवार अपक्ष आहेत.
राज्यातील प्रमुख पक्षांनी अपेक्षेहून कमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. काँग्रेसने केवळ ९ मुस्लीम उमेदवार दिले आहेत. तर भाजपकडून एकाही मुस्लीम उमेदवाराला तिकीट देण्यात आलेलं नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने पाच जणांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली आहे.
सर्वाधिक मुस्लीम उमेदवार ओवैसींचे
असदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाने सर्वाधिक १६ मुस्लीम उमेदवारांना विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. तर लहान पक्षांनी १५० उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. ४२० मुस्लीम उमेदवारांपैकी २१८ उमेदवार हे अपक्ष उमेदवार आहेत.
१५० हून अधिक मतदारसंघात एकही मुस्लीम उमेदवार नाही
राज्य निवडणूक विभागाच्या आकडेवारीनुसार, १५० हून अधिक मतदारसंघात एकही मुसलमान उमेदवार देण्यात आलेला नाही. तर जवळपास ५० मतदारसंघांपैकी केवळ एक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आला आहे.
महाराष्ट्रात ‘बटेंगे तो कटेंगे’चा जयघोष, कोणत्या पक्षाने किती मुस्लीम उमेदवारांना तिकीट दिलं? आकडेवारी समोर
छत्रपती संभाजीनगर आणि मालेगावात काय परिस्थिती?
मालेगावात सर्व १३ उमेदवार मुस्लीम आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक उमेदवारांची संख्या सरासरीपेक्षा अधिक आहे. इथे निवडणूक लढवणाऱ्या २९ पैकी १७ उमेदवार मुस्लीम आहेत, तर तीन महिला आहेत. दुसरीकडे महाराष्ट्रभरात मुस्लीम महिलांचं प्रतिनिधित्व अतिशय कमी असल्याचं समोर आलं आहे. एकूण उमेदवारांमध्ये केवळ २२ महिला मुस्लीम उमेदवार आहेत. म्हणजेच केवळ ५ टक्के मुस्लीम महिला उमेदवार आहेत.