Harshvardhan Jadhav vs Sanjana Jadhav: महायुतीच्या उमेदवार संजना जाधव व महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंह राजपूत आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात प्रमुख लढत आहे. या उमेदवारांची मतपेरणी वर्षभरापासून सुरू होती.
कन्नड विधानसभा मतदारसंघात उमेदवारांनी जोरदार प्रचार सुरू केला आहे. पण, मतदारांशी संपर्क साधताना अनेकांची दमछाक होत आहे. आचारसंहिता व कार्यकत्यांची वानवा असल्यामुळे पदाधिकारी जेरीस आले आहेत. महायुतीच्या उमेदवार संजना जाधव व महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंह राजपूत आणि अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांच्यात प्रमुख लढत आहे. या उमेदवारांची मतपेरणी वर्षभरापासून सुरू होती. महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंह राजपूत पाच वर्षातील विकसकामांचा पाढा वाचून दाखवत आहेत. निष्ठावान उमेदवार म्हणून प्रचार करीत आहेत. महायुतीच्या उमेदवार संजना जाधव राज्य सरकारच्या योजना मतदारांसमोर मांडत आहेत. तर हर्षवर्धन जाधव यांनी शेतकऱ्यांसाठी केलेली कामे व एमआयडीसी सुरू करण्यासाठी केलेले प्रयत्न समोर आणले आहेत. पिशोर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात सभा झाल्या आहेत. प्रचाराची पहिला टप्पा पूर्ण होऊनही दुर्गम भागापर्यंत उमेदवारांना पोहचणे अवघड झाले आहे.
महायुतीची प्रचाराकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवार संजना जाधव यांचा प्रचार स्वतःचे कार्यकर्ते व भाजप पदाधिकाऱ्यांवर अवलंबून आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार उदयसिंह राजपूत प्रचार करीत असले तरी काही ठिकणी पदधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नसल्याचे दिसत आहे. अपक्ष हर्षवर्धन जाधव यांची प्रचाराची भिस्त कार्यकत्यांवर व महायुतीच्या बंडखोरांनी दिलेल्या पाठिंब्यावर आहे. विविध उमेदवाराचे कार्यकर्ते सोशल मिडीयाचा पुरेपूर वापर करीत एकमेकांची उणीदुणी काढत आहेत. उदयसिंह राजपूत व हर्षवर्धन जाधव पाचव्यांदा विधानसभा निवडणूक लढवत आहेत. संजना जाधव पहिल्यांदाच निवडणुकीला सामोऱ्या जात आहेत.
सन २००९ मध्ये हर्षवर्धन जाधव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून विजयी झाले होते. त्यांनी उदयसिंह राजपूत यांचा चार हजार १०७ मतांनी पराभव केला होता. सन २०१४मध्ये हर्षवर्धन जाधव शिवसेनेकडून विजयी झाले होते. त्यांनी उदयसिंह राजपूत यांचा एक हजार ५६१ मतांनी पराभव केला होता. तर, २०१९मध्ये उदयसिंह राजपूत शिवसेनेकडून विजयी झाले होते. त्यांनी हर्षवर्धन जाधव यांचा १८ हजार ६९० मतांनी पराभव केला होता. जाधव दाम्पत्यात चुरस असून तिसरे तुल्यबळ उमेदवार यांनी आपल्या प्रचाराचा आवाका वाढवला आहे. त्यामुळे ही लढत उत्सुकतेची ठरली आहे.
१६ उमेदवार रिंगणात
कन्नड मतदारसंघात १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हर्षवर्धन जाधव (अपक्ष), उदयसिंह राजपूत (शिवसेना उध्दव बाळासाहेब पक्ष), संजना जाधव (शिवसेना), मनोज पवार (अपक्ष), आयास शाह (वंचित बहुजन आघाडी), हय्यास सय्यद (जनहित लोकशाही पार्टी), अब्दुल जावेद अब्दुल वाहेद (अपक्ष), मनीषा राठोड (अपक्ष), लखन चव्हाण (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), युवराज बोरसे (अपक्ष), विकास बरबंडे (हिंदू समाज पार्टी), सईद अहमद पठाण (अपक्ष), संगीता जाधव (अपक्ष), वैभव भंडारे (अपक्ष), विठ्ठलराव थोरात (अपक्ष), रंजना जाधव (अपक्ष) हे उमेदवार आहेत.