Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईच्या चांदिवलीत प्रचारासाठी गेले होते. त्यावेळी काही जणांनी शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल रात्री मुंबईच्या चांदिवली भागात होते. शिंदेसेनेचे उमेदवार दिलीप लांडे यांच्यासाठी प्रचार सभा घेतल्यानंतर शिंदे निघाले. तेव्हा रस्त्यात काँग्रेस, ठाकरेसेनेच्या कार्यकर्त्यांनी शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. शिंदेंना काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी संतोष कटके नावाच्या तरुणानं मुख्यमंत्र्यांना पाहून गद्दार गद्दार अशी घोषणा दिली. घोषणा ऐकताच मुख्यमंत्र्यांचा पारा चढला.
मुख्यमंत्र्यांनी त्यांची कार थांबवली. कारची काच खाली करत त्यांनी सोबत असलेल्या सुरक्षा रक्षकांना धरा त्याला धरा अशा सूचना केल्या. यानंतर काही क्षणांत मुख्यमंत्री स्वत: कारमधून उतरले. त्यांच्या चेहऱ्यावर संताप स्पष्ट दिसत होता. कार्यकर्त्यांना हेच शिकवता का, असा सवाल करत शिंदे थेट मविआच्या उमेदवाराच्या कार्यालयात गेले. चांदिवलीतून मविआकडून नसीम खान निवडणूक लढवत आहेत. ते काँग्रेसचे नेते आहेत.
Eknath Shinde: हेच शिकवता का कार्यकर्त्यांना? ‘तो’ शब्द ऐकताच शिंदेंचा संताप; ताफा थांबवला, कारमधून उतरले
मुख्यमंत्र्यांना उद्देशून अपशब्द वापरणाऱ्या संतोष कटके नावाच्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याला सोडून देण्यात आलं. विशेष म्हणजे संतोष कटकेनं आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. त्याच्या वडिलांदेखील शिवसेनेत प्रवेश केला.
मुख्यमंत्र्यांना शिंदे यांना थेट गद्दार म्हणणाऱ्या संतोष कटके यांना घेऊन ठाकरेसेनेचे कार्यकर्ते मातोश्रीवर गेले. तेव्हा काल कोण होतं शाखेत? त्यांनी समोर या, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तेव्हा हा होता असं म्हणत कटकेंना पुढे केलं. कटकेंना पाहताच ठाकरे शाब्बास म्हणाले. पुष्पगुच्छ देत त्यांचं कौतुक केलं. हा फोटो मुद्दाम घ्या. त्यांच्यापर्यंत जाऊ द्या, असं ठाकरे यावेळी म्हणाले.