उद्धव ठाकरेंसोबत येण्यास राज सकारात्मक! वायकरांकडून पैसे-वस्तूचं वाटप, जोगेश्वरीत अनिल परब आक्रमक

Daily Top 10 Headlines in Marathi; रोजच्या ताज्या लेटेस्ट मराठी बातम्या: सकाळच्या महत्त्वाच्या हेडलाईन्सचा थोडक्यात आढावा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’वर, पुढील लिंकवर क्लिक करुन वाचा सविस्तर बातमी

१. ‘शरद पवारांनी त्यांच्या पक्षातील दोन नेत्यांची नावे मुख्यमंत्री म्हणून जाहीर करावीत, काँग्रेसनेही तसे करावे. शिवसेनेकडून मात्र मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण असेल, हे राज्याची जनताच ठरवेल,’ अशी भूमिका शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना मांडली.
२. हेलिकॉप्टरमधून उतरताना उद्धव ठाकरे यांची बॅग तपासली, ज्याच्या हातातून आजपर्यंत काही निघालं नाही, त्याच्या बॅगेत काय असणार? असं म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवर टीकेची झोड उठवली. मुंबईतील विक्रोळी येथे आयोजित प्रचारसभेदरम्यान राज बोलत होते.

३. सगळ्या राज्याचे लक्ष लागून असलेली ‘हेवीवेट’ लढत नागपुरातील दक्षिण पश्चिम मतदारसंघात होत आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सलग चौथ्यांदा लढून विक्रम प्रस्थापित करण्याच्या प्रयत्नात आहेत, तर काँग्रेसने ही लढत वजनदार करण्यासाठी प्रफुल्ल गुडधेंच्या रूपाने राष्ट्रीय सचिव मैदानात उतरवला आहे. ‘वंचित’चे विनय भांगे मैदानात असले, तरी ही लढत थेट होईल, असे दिसत आहे.

४. जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते महिलांना पैसे आणि काही वस्तू वाटप करत असल्याची बातमी मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली होती. यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्री क्लब येथे जाब विचारायला गेले होते. त्याचवेळी शिंदे गटाचे आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने जोरदार राडा झाला. पण ऐनवेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. बातमी वाचा सविस्तर…

५. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र यावेत, यासाठी अनेक समर्थक प्रयत्नशील असल्याचं बोललं जातं. दोघांनीही आतापर्यंत या विषयावर उघडपणे भाष्य करण्याचं टाळलं होतं. मात्र एकत्र येण्यासाठी चर्चा तर व्हायला हवी, असं म्हणत राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच सकारात्मकता दर्शवली आहे. उद्धव यांना भावापेक्षा काँग्रेस-राष्ट्रवादी जवळचे वाटतात, असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला. बातमी वाचा सविस्तर…

६. माहीम रेतीबंदर येथील कोळीवाड्यात शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आमदार सदा सरवणकर यांना खडे बोल सुनावणारी महिला मंगला तांडेल यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मंगळवारी (१२ नोव्हेंबर २०२४) धमक्यांचे फोन येऊ लागले होते. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार महेश सावंत यांनी त्यांची भेट घेतली. तसेच, संपूर्ण शिवसेना उद्धव ठाकरे गट त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत त्यांना धीर दिला आहे.

७. नगर येथील महिला कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणातील महत्वाच्या साक्षिदारांपैकी एक असलेल्या महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकारी विजयमाला रमेश माने यांनी न्यायालयात आरोपींना ओळखले नाही. त्यामुळे सरकारी वकिलांनी त्यांना फितूर घोषित केले. जरे यांची मोटार घाटात अडवून खून झाला होता. त्यावेळी माने या जरे यांच्यासोबत होत्या. त्याअनुषंगाने त्यांची साक्ष नोंदविण्यात आली. बातमी वाचा सविस्तर…

८. जन्मताच बाळ दगावल्याने डॉक्टरांवर निष्काळजीचा आरोप करीत २० ते २५ जणांनी सांताक्रूझ येथील रुग्णालयात गोंधळ घातला. ‘गर्भवती राहिल्यापासून महिलेची नीट काळजी न घेतल्याने बाळाचा मृत्यू झाला. याची कल्पना नातेवाईकांना देऊनही त्यांनी मारहाण केली.’ असा आरोप डॉक्टरांनी केला. नातेवाईकांनी वैद्यकीय अधीक्षकांना घेराव घालत त्यांनाही धक्काबुकी करण्यात आल्याचे समजते. या प्रकरणी चाकोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

९. क्योकी सांस भी कभी बहू थी या सुपरहिट मालिकेत दिसलेला अभिनेता अमित टंडन सध्या इंडस्ट्रीतून गायब आहे. अलीकडेच सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत त्याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. या मुलाखतीत त्याने त्याच्या पत्नीची फसवणूक केल्याचे कबूल केले. या गोष्टींमुळे त्याचे नाते कसे बिघडले याबद्दल तो बरेच काही म्हणाला.

१०. देशांतर्गत शेअर बाजारात चढ-उतार होत असताना आता गुंतवणूकदारांना स्विगीच्या आयपीओ लिस्टिंगची उत्सुकता लागून आहे. स्विगीच्या आयपीओचा फायदा गुंतवणूकदारांना मिळणार नाही पण, कंपनीच्या कर्मचाऱ्यांची मात्र चांदी होणार आहे. स्विगीचे ५०० कर्मचारी करोडपती होण्याची शक्यता आहे. इतकेच नव्हे तर नवीन आणि जुन्या अशा सुमारे ५००० कर्मचाऱ्यांना शेअर्सच्या लिस्टिंगनंतर मोठी कमाई अपेक्षित आहे. ज्या कर्मचाऱ्यांना कंपनीने ESOP (कर्मचारी स्टॉक ओनरशिप प्लॅन) दिला आहे त्यांना शेअर्सच्या लिस्टिंगचा खूप फायदा होणार आहे.

Source link

maharashtra times top 10 headlinestoday breaking newstoday top storiestop 10 headlinesआजच्या ठळक घडामोडीआजच्या ठळक बातम्याटॉप १० हेडलाईन्समहाराष्ट्र टाइम्स टॉप १० हेडलाइन्स
Comments (0)
Add Comment