उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भाजपसोबत जाण्याच्या निर्णयाबाबत केलेल्या गौप्यस्फोटावरून वाद निर्माण झाला आहे. पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत उद्योगपती गौतम अदानी यांच्या उपस्थितीत बैठक झाल्याचा दावा केला होता. मात्र, नंतर त्यांनी या दाव्यावरून यू-टर्न घेत अशी कोणतीही बैठक झाली नसल्याचे म्हटले आहे. यावरून शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही आश्चर्य व्यक्त केले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचारासाठी बारामतीत आले होते. बारामतीतील लोणी भापकर, जळगाव क.प, मेडद या ठिकाणी त्यांनी मतदारांशी संवाद साधला. दरम्यान त्यांना पत्रकारांनी पाच वर्षांपूर्वी गौतम आदमी आणि अमित शहा यांनी मध्यस्थी केली होती. असा प्रश्न केला असता, पवार म्हणाले की,नाही अशी काही मध्यस्थी झाली नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली.
सध्या राज्यात निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रत्येक पक्षाकडून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी जोरदार व्यूहरचना आखून प्रचार सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गौप्यस्फोट केला होता. याची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. याची जोरदार चर्चा सुरू असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवारांना याच विषयावर पत्रकारांनी विचारल्यावर त्यांनी आज छेडले असता त्यांनी गौतम अदानी बैठकीला उपस्थित नव्हते म्हटल्याने दादांनी यू-टर्न घेतल्याचं बोललं जात आहे.
अशी कोणतीही मीटिंग झाली नाही- सुप्रिया सुळे
मी ऑन कॅमेरा सांगते, अशी कुठलीही मीटिंग झाली त्याची माहिती मला नाही. झाली की नाही ते मला माहिती नाही. आम्हाला कुणालाच माहिती नव्हतं, हे मी या आधी सांगितलेलं आहे. मला अजूनही तो दिवस आठवतो मी सकाळी झोपले होते. सदानंद सुळे यांनी मला उठवलं आणि सांगितले की टीव्ही बघा काय सुरु आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.