Eknath Shinde: पालघरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आलेली आहे. तपासणीनंतर शिंदेंनी माजी मुख्यमंत्री ठाकरेंनी जोरदार टोला लगावला.
मुख्यमंत्री शिंदे आज निवडणूक प्रचारासाठी पालघरमध्ये आहेत. पोलीस परेड मैदानात त्यांचं हेलिकॉप्टर लँड झालं. त्यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील बॅगांची तपासणी केली. त्यात अधिकाऱ्यांना कपडे, पाण्याच्या बाटल्या आढळून आल्या. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना सगळ्या बॅगा उघडून दाखवण्याची सूचना केली.
निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांकडून बॅगांची तपासणी झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे त्यांच्या नियोजित दौऱ्यासाठी रवाना झाले. कारमधून प्रचारसभेच्या ठिकाणाला निघण्यापूर्वी शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेना उबाठाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. नियमानुसार बॅगांची तपासणी झाली. अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, असं शिंदे म्हणाले.
कर नाही त्याला डर कशाला, असा सवाल विचारत शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला. ‘कर्मचाऱ्यांनी नियमानुसार बॅगा तपासल्या. माझ्या बॅगेत पैसेबिसे नाहीत, कपडे आहेत. ते त्यांनी चेक केले. बाकी दैनंदिन साहित्य आहे. युरिन पॉट नाही,’ असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंनी टोला लगावला. यवतमाळच्या वणीमध्ये ठाकरेंचं हेलिकॉप्टर तपासलं गेलं. त्यावेळी युरिन पॉट पण तपासा, असं ठाकरे खोचकपणे म्हणाले होते. त्यावरुन शिंदेंनी चिमटा काढला.
Eknath Shinde: शिंदेंच्या बॅगांचीही तपासणी; CM म्हणतात, त्यात फक्त कपडे! युरिन पॉटवरुन ठाकरेंना टोला
निवडणूक आयोगाचे कर्मचारी, अधिकारी त्यांचं काम करत आहेत. त्यांची काय चूक आहे. ते कर्मचारी, अधिकारी आहेत. त्यांच्यावर काय राग काढायचा, असा सवाल विचारत शिंदेंनी नाव न घेता ठाकरेंना लक्ष्य केलं. परवा यवतमाळमध्ये आणि काल लातूरमध्ये ठाकरेंच्या बॅगांची तपासणी निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांनी केली. त्यावेळी ठाकरेंनी त्यांचा व्हिडीओ काढला होता. अधिकाऱ्यांना त्यांची नावं विचारली. त्यांना नियुक्तीपत्रं दाखवण्यास सांगितली होती.