Mumbai Crime: गोराई परिसरातील झाडाझुडपात रविवारी गोणीमध्ये एक मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे सात तुकडे करून ते प्लस्टिकच्या चार मोठ्या डब्यांमध्ये कोंबून गोणीत भरण्यात आले होते.
काय आहे प्रकरण?
रघुनंदन पासवान असे मृत तरुणाचे नाव असून त्याचे एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटुंबीयांना आंतरधर्मीय प्रेमसंबंध मान्य नव्हते आणि त्यातूनच ही हत्या करण्यात आली. पोलिसांनी या प्रकरणी मोहम्मद सत्तार या आरोपीला अटक केली आहे. आरोपी मुलीचा नातेवाईक असल्याचे म्हटले जात आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. गोराई परिसरातील झाडाझुडपात रविवारी गोणीमध्ये एक मृतदेह सापडला होता. मृतदेहाचे सात तुकडे करून ते प्लस्टिकच्या चार मोठ्या डब्यांमध्ये कोंबून गोणीत भरण्यात आले होते. गोराई पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून तुकड्यांमधील मृतदेह वैद्यकीय विश्लेषणासाठी रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून गोराई पोलिसांनी तपास सुरू केला. मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे तसेच मिरा भाईंदर आयुक्तालयात बेपत्ता झालेल्या व्यक्तींची माहिती मिळविण्यात आली. त्यावेळी अंधेरी पोलिस ठाण्यात बेपत्ता म्हणून नोंद असलेल्या तरुणाशी मृतदेहाचे वर्णन मिळतेजुळते असल्याचे दिसले.
रघुनंदन पासवान अशी मृतांची ओळख पटल्यानंतर पोलिसांनी त्याच्याबाबत अधिक माहिती जमा केली. तपासादरम्यान भाईंदर येथील झोपडपट्टीमध्ये वास्तव्यास असलेल्या मोहम्मद सत्तार याचे नाव पुढे आले. मुंबई पोलिसांनी भाईंदर पोलिसांच्या मदतीने सत्तार याला ताब्यात घेतले. ३१ ऑक्टोबर रोजी सत्तार याने रघुनंदन याला भाईंदर येथे बोलावले. दोघेही एकमेकांना ओळखत असल्याने रघुनंदन त्या ठिकाणी गेला. सत्तार याने रघुनंदन याला रात्री दारू पाजली आणि त्यानंतर सुरीने गळा कापून त्याची हत्या केली. मृतदेहाची विल्हेवाट लावण्याकरिता त्याने सुरीने सात तुकडे केले व ते प्लास्टिकच्या डब्यात कोंबून गोणीमध्ये भरले आणि गोराई येथे फेकले.