Evening Ritual Importance : घर म्हणजे फक्त चार भिंती आणि एक छप्पर नाही. ती एक वास्तू आहे आपल्या हक्काची जे आपण सुख, दुःख, आनंद, हसणं, रडणं, जिव्हाळा आणि प्रेम अशा अनेक भावनांनी भरलेलं असतं. घरात सुख-शांती नांदावी किंवा सगळ्यांना मानसिक समाधान मिळावं याकडे घरातील ज्येष्ठ मंडळी कायम लक्ष देत असतात. घरातील मांगल्यपूर्ण आणि प्रसन्न वातावरण आपल्याला समाधान देत, कधी विचार केला आहे का घरातील वातावरण आनंदी ठेवण्यासाठी काय करायला हवे? चला तर जाणून घेवूया.
तिन्हीसांजेला दिवा लावा
एका काळ होता जेव्हा वाडा, बंगले किंवा मोठी घर होती पण आता शहरांचा विकास झाला आणि घरं लहान झाली. तसं पाहिलं तर घर लहान असो वा मोठं घर हे घर असतं. आपल्या हक्काची, सुख समाधानाची जागा. लोकांची घरे लहान असतील तरी आजही संध्याकाळी घरासमोरील तुळशीजवळ दिवा लागतो. संध्याकाळी शुभंकरोती म्हटलं जातं. आई-आजी सारखं सारखं सांगतात संध्याकाळच्या प्रार्थना- श्लोक म्हणा पण आपण कंटाळा करतो. पण या सवयीने आयुष्यात एक शिस्त लागते. संध्याकाळी देवासमोर दिवा लावा. घरात धूप दाखवा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि वातावरण प्रसन्न राहते. संध्याकाळी तुळशीजवळ आवर्जून दिवा लावावा. दिव्याचा तो मिणमिणता प्रकाश मनाला एक वेगळाच आनंद देतो.
संध्याकाळी ग्रामदेवतेची उपासना
गावात संध्याकाळी खास ग्रामदेवतेची उपासना केली जाते. संध्याकाळी ग्रामदेवतेच्या मंदिरात जावून दिवा लावला की घंटानाद होतो. त्यानंतर घराघरात आणि तुळशीजवळ दिवे लागणी होते. असे मानले जाते की ग्रामदेवता संध्याकाळी गावात फेरफटका मारत असते आणि ज्या घरात दिवे लागलीत तिथे ती निवास करते. असेही म्हणतात, कातरवेळ होताच ईशान्य दिशेकडून लक्ष्मी घुबडावर बसून येते आणि अनेक रुप धारण करुन जेथे दिवा लावणी होते त्या घरात प्रवेश करते. म्हणून तर घुबड पक्षी सुद्धा कातरवेळीच बाहेर पडतो. कातरवेळी घुबड दिसला की समजून जायचे, लक्ष्मी आजूबाजूला अदृश्य रुपाने वावरत आहे. तुळस आणि लक्ष्मी दोघी एकमेकींच्या सखी आहेत. त्या कातरवेळी एकमेकींशी गप्पा मारतात म्हणून कातरवेळी तुळशीजवळ दिवा लावला जातो.
सात्त्विक लहरींचे संरक्षक कवच
तिन्हीसांजेला म्हणजेच दिवेलागणीच्या वेळी देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने घराभोवती देवतांच्या सात्त्विक लहरींचे संरक्षक कवच निर्माण होते. त्यामुळे घरातील व्यक्तींचे वातावरणातील वाईट शक्तींच्या संचारामुळे प्रक्षेपित होणार्या त्रासदायक लहरींपासून रक्षण होते. म्हणून शक्यतो दिवेलागणीच्या वेळेपूर्वी घरी यावे किंवा दिवेलागणीनंतर घरातून बाहेर पडू नये असे आपल्याला घरातून वारंवार सांगितले जाते. अनेक वाईट शक्ती तिन्हीसांजेच्या वेळी सर्वांत जास्त प्रमाणात धोकादायक होतात.
शुंभकरोती कल्याणम
संध्याकाळी दिवेलागणी झाली की, शुंभकरोती तसेच अनेक श्लोक म्हटले जातात. मन आणि बुद्धी स्थिर राहण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आपल्या देहाभोवती संरक्षक कवच निर्माण होऊन वाईट शक्तींपासून रक्षण होते. तसेच देवाच्या आशीर्वादामुळे देहात कार्यरत असणारी शक्तीची स्पंदने अधिक तीव्र होतात. मुलांच्या मनातील भीती दूर होऊन त्यांना देवाशी अनुसंधान साधता येते.
दिवा लावणे…अग्निला आवाहन
आता दिवे का लावावेत हे प्रथम लक्षात घ्या. दिवे लावणे म्हणजे अग्नीस आवाहन करणे. सूर्य मावळल्यानंतर, वातावरणातील प्रकाश आणि ऊर्जा दोन्ही कमी होते. यामुळे जे जीवजंतू सूर्यप्रकाशात टिकू शकत नाहीत असे जीव वातावरणात लगेच पसरतात. असे जीव हे अतिसूक्ष्म असल्याने शरिरावरील जी रंध्रे असतात त्याद्वारे मोठ्या प्रमाणात शरिरात प्रवेश करू शकतात आणि स्वास्थ्य बिघडवू शकतात. वातावरणात सूक्ष्मजीव असतात त्यांना आळा घालण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. सूर्य मावळल्यानंतर ती ऊर्जा, सर्वत्र दिवे लावून मिळवता येते. म्हणून दिवे लावावेत. तसेच प्रकाशाचीही कमतरता भरुन निघते. सूर्योदय आणि सूर्यास्त यावेळेस वातावरणात अनेक बदल घडत असतात. वातावरणामध्ये होणारे बदल आणि जीवजंतूंची होणारी वाढ फक्त तेलाच्या किंवा तुपाच्या दिव्याद्वारे वातावरणात सोडल्या जाणाऱ्या लहरींद्वारे कमी केली जाते. म्हणून संध्याकाळी तेल, तूपाचा दिवा लावणे महत्त्वाचे आहे.