विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे काही दिवस राहिलेले असताना नाशकात राडा झाला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते बिघडल्यानं तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे.
नाशिक पूर्व मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार गणेश गिते यांच्या कारवर हल्ला झाला. हा हल्ला भाजपच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप गितेंच्या कार्यकर्त्यांकडून केला आहे. तर गितेंचे कार्यकर्ते पैसे वाटप करत होते, असा गंभीर आरोप भाजपकडून केला गेला आहे. मविआकडून होत असलेलं पैसे वाटप थांबवल्याचा भाजप कार्यकर्त्यांचा दावा आहे.
गणेश गिते आधी भाजपमध्ये होते. ते विधानसभा निवडणूक लढण्यास उत्सुक होते. पण त्यांना पक्षानं तिकीट दिलं नाही. गितेंनी शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत उमेदवारी मिळवली. भाजपनं आपल्या विरोधात डमी उमेदवार दिल्याचा आरोप गितेंनी आधी केला होता. त्यानंतर आज महायुती आणि महाविकास आघाडीत प्रचारादरम्यान ठिणगी पडली. नाशिक पूर्वेत भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले, मनसेचे प्रसाद सानप आणि राष्ट्रवादी शपचे गणेश गिते असा तिरंगी सामना होत आहे
पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाजपची रॅली सुरु होती. गितेंचे, मविआचे कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचं भाजप कार्यकर्त्यांना समजलं. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी गितेंच्या प्रचार रॅलीच्या दिशेनं मोर्चा वळवला. यानंतर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप केले.
गितेंनी पैसे वाटप केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला. तर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला करुन वाहनं फोडल्याचा आरोप गितेंच्या कार्यकर्त्यांनी केला. यानंतर मविआचे सर्व उमेदवार पोलीस आयुक्तालयाच्या दिशेनं रवाना झालेले आहेत. राष्ट्रवादी शपच्या खासदार सुप्रिया सुळेदेखील पोहोचल्या आहेत. त्या पोलीस आयुक्तांची भेट घेण्याची शक्यता आहे.