Maharashtra Election Survey: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला केवळ ५ दिवस राहिलेले असताना लोकपोलचा सर्व्हे आला आहे. त्यानुसार महायुतीला ११५ ते १२८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर महाविकास आघाडीला १५१ ते १६२ जागा मिळण्याची शक्यता आहे.
राज्यात भाजपविरोधी वातावरण आहे. मतदार अनेक प्रश्नांसाठी, समस्यांसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार मानतात. तर महायुतीमधील सर्वाधिक लोकप्रिय चेहरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, असे निष्कर्ष लोकपोलच्या सर्व्हेतून समोर आलेले आहेत. महाराष्ट्र विरुद्ध गुजरात हा विषय मतदारांना भावनिकदृष्ट्या जवळचा वाटतो. जनता मतांच्या ध्रुवीकरणास फारसा प्रतिसाद न देता शेती, रोजगार, महिला सुरक्षा आणि महागाई या मुद्द्यांचा विचार करुन मतदान करेल, अशी माहिती सर्व्हेतून पुढे आली आहे.
लोकसभा निवडणुकीप्रमाणेच काँग्रेसला विधानसभेतही घवघवीत यश मिळालं. काँग्रेस पक्ष भाजपला पर्याय म्हणून समोर येईल, असं लोकपोलचा अंदाज आहे. मविआ नेत्यांच्या सभांमुळे, भाषणांमधून कार्यकर्ते चार्ज झाल्याचं सर्व्हे सांगतो. वंचित बहुजन आघाडी, एमआयएमसारख्या पक्षांना फारशी चमक दाखवता येणार नाही. पण महायुती आणि मविआसमोर बंडखोरांचं आव्हान असेल, असं सर्वेक्षण सांगतं.
महायुतीत अजित पवार, तर महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे कच्चा दुवा ठरतील, असं निरीक्षण नोंदवण्यात आलेलं आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमुळे युतीचे काही मतदार त्यांच्यापासून दुरावण्याची शक्यता आहे. त्यामुळे अजित पवार महायुतीसाठी अडचणीचे ठरु शकतात. महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे कच्चे दुवे आहेत. ठाकरेसेना काँग्रेसच्या व्होट बँकवर अवलंबून असल्याचं सर्व्हे सांगतो.
Maharashtra Election Survey: महायुती, मविआत २ कच्चे दुवे; बड्या नेत्यांची नावं समोर; सर्व्हेतून कोणासाठी धोक्याचा इशारा?
लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला ओबीसी मतदार अधिक प्रमाणात महायुतीकडे जातील. पण ओबीसींचं एकगठ्ठा मतदान त्यांच्याकडे जाणार नाही. मराठा मतदार बहुतांश प्रमाणात मविआकडे जाईल. अनुसूचित जातीचे मतदारदेखील मविआला साथ देतील, असं अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. याचा अर्थ विधानसभेला मतदानाचा पॅटर्न लोकसभेसारखाच राहण्याची शक्यता आहे.