Ladki Bahin Yojana: कोल्हापुरात भाजपच्या महिला उपाध्यक्षा मेघाराणी जाधव यांनी लाडकी बहीण योजनेबद्दल केलेल्या विधानानं नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
करवीर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रदिप नकरे यांच्या प्रचारासाठी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिंदेसेनेच्या नकरे यांच्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी भाषणं केली. त्यांना मोठ्या मताधिक्क्यानं निवडून देण्याचं आवाहन केलं. यावेळी भाषण करताना भाजपच्या महिला उपाध्यक्षा मेघाराणी जाधव यांनी महिलांवर थेट दमदाटी केली. त्यामुळे त्या अडचणीत येण्याची शक्यता आहे.
‘बायकांनो, तुम्हाला शप्पथ आहे. तुम्ही आता जाताना सांगायचं की धनुष्यबाणालाच मतदान करायचं आणि जर का मतदान केलं नाहीत, इकडं तिकडं जर काही कळालं तर १५०० रुपये दिलेत. पण तुमच्याकडून ३ हजार रुपये वसूल करु,’ असा दमच जाधव यांनी भरला. लाडकी बहीण योजनेवर बोलताना जाधव यांनी उपस्थित असलेल्या महिलांवरच दमदाटी केली.
लोकसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली. या योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांच्या बँक खात्यात दरमहा १५०० रुपये जमा केले जातात. आतापर्यंत महिलांना ५ महिन्यांचे ७५०० रुपये देण्यात आलेले आहेत. पुन्हा सत्तेत आल्यास २१०० रुपये देऊ, असं आश्वासन महायुतीकडून देण्यात आलं आहे. पण महायुतीचे नेते आता यावरुन महिलांना थेट इशारेच देऊ लागले आहेत.
काय म्हणालेले खासदार धनंजय महाडिक?
भाजप खासदार धनंजय महाडिक यांनीच ४ दिवसांपूर्वीच लाडकी बहीण योजनेवर बोलताना भरसभेत वादग्रस्त विधान केलं. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या सभेत आणि रॅलीत दिसले. तर त्यांचे फोटो काढा आणि आम्हाला पाठवा, आम्ही त्यांची व्यवस्था करतो,’ असा दम महाडिकांनी दिला.
Ladki Bahin: १५०० रुपये दिलेत, धनुष्यबाणाला मतदान केलं नाही तर…; भाजप नेत्याची लाडक्या बहिणींना उघड धमकी
‘या ठिकाणी काँग्रेसची रॅली निघाली, तर त्या रॅलीमधील महिलांचे फोटो काढा. लाडकी बहीण योजनेतून ज्या महिला १५०० रुपये घेतात, त्यांचे फोटो काढून आम्हाला द्या. घ्यायचं शासनाचं आणि गायचं त्यांचं असं अजिबात चालणार नाही. अनेक ताई आहेत ज्या छात्या बडवून सांगत आहेत की, आम्हाला या योजनेचे पैसे नकोत. जर पैसे नको असतील, तर राजकारण का करताय? ज्यांना या योजनेचे पैसे नकोत, त्यांना म्हणायचं या फॉर्मवर सही कर, उद्यापासून लाडक्या बहीण योजनेचे पैसे बंद’, असं महाडिक सभेत म्हणाले होते. यावरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी त्यांच्यावर टिकेची झोड उठवली. त्यानंतर महाडिक यांनी सारवासारव केली.