Maharashtra Election 2024: बारामतीत आयोजित निर्भय बनो या सभेत बोलताना शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांनी कागल विधानसभा मतदारसंघातून हसन मुश्रीफांचा पराभव करायचा आहे, असा निर्धार व्यक्त केला.
बारामतीत डॉ. विश्वंभर चौधरी, एडवोकेट असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पाटील बोलत होत्या. यावेळी प्रतिभा पवार, माजी आमदार लक्ष्मण माने उपस्थित होते.
त्यापुढे बोलताना म्हणाल्या की शरद माझ्यापेक्षा लहान आहे. त्याची तब्येत बरी नाही. तरी तो एवढा फिरतो आणि आपण घरी कसं बसायचं, माझ्यातही ताकत नाही. पण मी कोल्हापूरमध्ये फिरते मला खात्री आहे की, विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरमध्ये जयंत पाटील, विश्वजीत कदम, समरजीत घाडगे यांच्यासह सर्व महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून येणार आहेत. मला फक्त हसन मुश्रीफांना पाडायचे आहे. त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत.
सध्या महाराष्ट्र हा अंधारात चाचपडत आहे. प्रतिगामी शक्ती डोके वर काढत आहेत हे पाहून अतिशय वेदना होतात. माझा महाराष्ट्र कसा होता आणि आज काय परिस्थिती झाली आहे. यामुळे मला रात्रभर झोप आली नाही. बीजेपीची ही विषवल्ली मुळासकट उपटली पाहिजे. तुम्ही तुमच्या तरुण मुलांकडे लक्ष द्या.. भिड्यांच्या कळपात तर जात नाहीत ना हे बघा.. तो मुलांना चैनीला पैसे देतो.. दारू देतो. आणि प्रचार कर म्हणतो.. आपली तरुण मुले त्याच्या कळपात सापडत आहेत.
असीम सरोदे, ज्ञानेश महाराव, निरंजन टकले, निखिल वागळे हे देशभर फिरत आहेत. हे अंधारातील प्रकाश किरणे आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांचं संरक्षण करावं त्यांनी अंगरक्षक ठेवावेत. कारण काही इतके दृष्ट लोक आहेत की, गांधीजी, दाभोळकर, पानसरेंचा वध करायला घाबरले नाहीत. त्यांना अशा विचारांची माणसे चालत नाहीत. त्यामुळे त्यांनी संरक्षण घ्यायला पाहिजे असेही पाटील म्हणाला.