Maharashtra Election 2024: जातीच्या राजकारणावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या आरोपींकडे लक्ष देण्याची गरज नसल्याचे उत्तर शरद पवार यांनी एका मुलाखतीत दिले.
राज्यातील विधानसभा निवडणूक ही महाविकास आघाडी विरुद्ध महायुती अशी असली तरी राज ठाकरे यांच्या मनसेने देखील उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. राज ठाकरे काही दिवसांपूर्वी असे म्हणाले होते की, शरद पवारांनी जातीचे राजकारण केले. अशा प्रकारचे राजकारण कधी अजित पवारांनी केलेले दिसत नाही. पवारांनी फोडाफोडीचे राजकारण केले.
राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेवर आता शरद पवारांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांनी जे काही विधान केले आहे त्याला काही आधार आहे की नाही मला माहीत नाही. पण काहीही ठोकून द्यायचे. कोणी तरी मूर्खासारखे काहीही बोलत असेल तर त्याची नोंद का घ्यायची? असा सवाल देखील पवारांनी उपस्थित केले. इतक्या वर्षाच्या राजकारणात मी जातीयवाद केल्याचे एक उदाहरण दाखवा असे देखील पवार म्हणाले. माझ्या नेतृत्वात पक्षात आणि सत्तेत असताना सरकारमध्ये विधीमंडळात नेतृत्व करण्याची संधी कोणाला देण्यात आली हे पाहा. असे सांगत पवारांनी मधुकर पिचड, छगन भुजबळ यांच्याकडे नेतृत्व दिले. आदिवासी, ओबीसी, दलित अशा विविध जाती-जमातीच्या लोकांची आम्ही नियुक्ती केल्याचे पवारांनी सांगितले.
एखादी गोष्ट १० वेळा बोलली तर लोकांना वाटते की काहीतरी असावे, त्यामुळे राज ठाकरे आरोप करत असतील असा टोला देखील शरद पवारांनी लगावला. ते साममराठी या वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते. शरद पवार जातीचे राजकारण करतात पुण्यातील एका कार्यक्रमात टिळकांची पुणेरी पगडी काढून त्यांनी ज्योतिबा फुले यांची पगडी घातली होती. पुणेरी पगडी न वापरता फुलेंची पगडी घाल असे म्हणणे याला आपला विरोध असल्याचे राज म्हणाले होते.