Shahaji Bapu Patil : शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांचा समावेश होता. त्यांना सांगोला मतदारसंघातून पुन्हा उमेदवारी मिळाली आहे. मटा ऑनलाईन पोलमधून त्यांच्या मतदारसंघाची आकडेवारी समोर आली आहे
कोणाला सर्वाधिक पसंती?
महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनने यूट्यूब चॅनेलवर पोल घेत युजर्सचा कौल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. २४ तासांच्या कालावधीत १ लाख ५४ हजारांहून अधिक ऑनलाईन युजर्सनी या पोलमध्ये आपला सहभाग नोंदवला. यातील आकडेवारीनुसार ५६ टक्के युजर्सनी आपली पसंती ठाकरे गटाच्या दीपक साळुंखे यांना दर्शवली आहे.
त्यांच्यानंतर शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांना २४ टक्के मतं मिळाली आहेत. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांमध्ये ३२ टक्के मतांचा फरक आहे. त्या खालोखाल तिसऱ्या क्रमांकावर शेकापचे बाबासाहेब देशमुख असून त्यांना २० टक्के युजर्सनी पसंती दिली आहे.
नेमकी किती मतं?
आकड्यांच्या भाषेत बोलायचं झालं, तर प्रथम क्रमांकावरील ठाकरे गटाच्या दीपक साळुंखे यांना ८६ हजारांच्या आसपास युजर्स (५६ टक्के) मतदान केले आहे. दुसऱ्या स्थानावरील शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांच्या पाठीशी ३७ हजारांच्या जवळपास (२४ टक्के) ऑनलाईन मतदार आहेत. तर तिसऱ्या नंबरवरील शेकापच्या बाबासाहेब देशमुख यांना साधारण ३० ते ३१ हजारांच्या घरात (२० टक्के) मतं पडली आहेत.
Sangola Online Poll : झाडी-डोंगार की जनता आसमान दाखवणार? शहाजीबापू नॉट ओक्केमध्ये? सांगोला ऑनलाईन पोलचे अंदाज
काय झाडी, काय डोंगार
शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांमध्ये शिवसेनेचे विद्यमान आमदार शहाजीबापू पाटील यांचा समावेश होता. यावेळी एका कार्यकर्त्यासोबत झालेल्या त्यांच्या संवादाची क्लीप सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाली होती. यात ते ‘काय झाडी.. काय डोंगार… एकदम ओक्केमध्ये आहे’ हा शहाजीबापूंच्या तोंडी असलेला डायलॉग अल्पावधीतच लोकप्रिय झाला होता. त्यावरुन नेटिझन्सनी मीम्सही बनवले होते.
आता प्रत्यक्ष मतदानात शहाजीबापू मतांचा ‘डोंगार’ पाहणार की नॉट ओक्के असणार हे २३ नोव्हेंबरला स्पष्ट होईल. कारण ऑनलाईन मतदान असल्यामुळे यात मतदारसंघाबाहेरील युजर्सनीही आपापली मतं नोंदवलेली आहेत. त्यामुळे हे आकडे प्रत्यक्ष मतदानाचे निदर्शक असू शकत नाहीत. किंबहुना ही आकडेवारी फसवीही असू शकते.