ED Raids: भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्यांनी वोट जिहादसाठी १२५ कोटी रुपये वापरण्यात आल्याचा आरोप करत खळबळ उडवून दिली. हवालाच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा त्यांनी केला.
हवालाच्या माध्यमातून वोट जिहादसाठी फंडिंग केलं जात असल्याचा आरोप ४ दिवसांपूर्वीच सोमय्यांनी केला. त्यानंतर कालच सोमय्या मालेगावात आले होते. बँकेतील कर्मचारी, १२ खातेदारांची भेट घेत त्यांनी परिस्थिती जाणून घेतली.
या प्रकरणाची ईडी, सीबीआयनं चौकशी करण्याची मागणी सोमय्यांनी केली. त्यानंतर आज ईडीचं पथक मालेगावात दाखल झालं आहे. विधानसभा निवडणुकीच्या कालावधीत ईडी सक्रिय झाल्यानं खळबळ उडाली आहे.
नाशिकच्या मालेगावात १२५ कोटींचे व्यवहार हवालाच्या माध्यमातून झाल्याचा सोमय्यांचा दावा आहे. या प्रकरणातील सर्व आरोपी ६ नोव्हेंबरपासून फरार आहेत. ते संगमेश्वर आनंदनगर भागातील रहिवासी आहेत. आज ईडीचे अधिकारी या भागात पोहोचले. त्यांनी संशयितांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची चौकशी केली. या संपूर्ण कारवाईबद्दल ईडीकडून अतिशय गुप्तता पाळली जात आहे.
नामको बँकेच्या शाखेतून १२५ कोटी रुपयांची अफरातफर झालेली आहे. या प्रकरणात फसवणूक झालेल्या तरुणांची सोमय्यांनी कालच भेट घेतली. ते बँक अधिकाऱ्यांनादेखील भेटले. त्यानंतर आता लगेचच दुसऱ्याच दिवशी ईडीनं तपास सुरु केला आहे.
एकूण १२ जणांच्या खात्यांमधून १२५ कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. ज्यांच्या खात्यांमध्ये हवाल्याचा पैसा आला, त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले आहेत. त्यांची चौकशी संपल्यानंतर अधिकाऱ्यांचं पथक बँकेत आणि पोलीस ठाण्यात पुढील चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे.
हवालाचा पैसा वोट जिहादसाठी वापरल्याचा सोमय्यांचा दावा आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी वोट जिहादचा आरोप करताना अनेक सभांमध्ये सातत्यानं मालेगावचा उल्लेख केलेला आहे. मालेगावात वोट जिहाद झाला आणि त्यामुळेच महायुतीचा उमेदवार पराभूत झाला, असा दावा फडणवीसांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर काही दिवसांनी केला होता. अनेक भाषणांमध्ये त्यांनी याचा आवर्जून उल्लेख केला.
फडणवीसांनी दिलेल्या आकडेवारीत काय?
धुळे लोकसभेत फक्त मालेगाव मध्य मतदारसंघामुळे महायुतीचे उमेदवार सुभाष भामरे पराभूत झाल्याचं फडणवीस यांनी त्यांच्या अनेक भाषणांमधून सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीत वोट जिहाद बघायला मिळाला.
धुळ्यातील सहा पैकी पाच मतदारसंघात आघाडीवर असलेला आमचा उमेदवार केवळ मालेगाव मध्य मतदारसंघात १ लाख ९४ हजार मतांनी मागे जातो आणि ४ हजार मतांनी हरतो, अशी आकडेवारी फडणवीसांनी वारंवार मांडली आहे.