BJP leader to join Shiv Sena UBT : तीन दिवसांपूर्वी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यासोबत नागरेंची नाशकात भेटही झाली होती.
गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई
नाशिक शहरातील तब्बल ३४८ गुन्हेगारांना हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आयुक्तांनी धडक कारवाई केल्याचे पाहायला मिळते. यामध्ये राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नाशिक भाजप कामगार आघाडीचे पदाधिकारी विक्रम नागरे, भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरे आणि वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार यांचाही हद्दपारीची कारवाई झालेल्या नेत्यांमध्ये समावेश आहे.
महाविकास आघाडीचे नाशिक पश्चिम मतदारसंघातील उमेदवार सुधाकर बडगुजर व नाशिक मध्य मतदारसंघातील वसंत गिते यांच्या प्रचारार्थ राऊत शनिवारी नाशिक दौऱ्यावर आले असता पवन पवार व विक्रम नागरे यांनी भेट घेतली होती. यावेळी वंचित बहुजन आघाडीला सोडचिठ्ठी देत शिवसेना ठाकरे गटात प्रवेश करण्याचा मनोदय पवार यांनी बोलून दाखवला होता.
गुरुवारी नाशिकमध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेवेळी दोन्ही माजी नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार होते. यासोबतच व्यंकटेश मोरेंचाही पक्षप्रवेश होणार होता. मात्र त्याआधीच हद्दपारीची कारवाई करण्यात आली. या ३४८ गुन्हेगारांमध्ये तिघांचा समावेश आहे.
वंचितकडून पवन पवार निलंबित
पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत पवन पवार यांना वंचित बहुजन आघाडीने तीन वर्ष पक्षातून निलंबित केले आहे. त्यांचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्वही रद्द करण्यात आले आहे. पक्षाच्या सर्व जबाबदाऱ्यांतून त्यांना मुक्त करण्यात आले. या संदर्भातील पत्र वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले आहे.