Symbolism Of Tortoise At Temples : बहुतेक मंदिराच्या बाहेर आपल्याला कासव दिसते. संगमरवर किंवा दगडाने बनलेले कासव जणू काही भक्तांच्या स्वागतासाठी आहे, असा अनेकांचा समज असेल, पण त्याबरोबर एक मोठा अर्थ त्यामागे आहे, चला तर जाणून घेवूया.
कासवाला सत्वगुणामुळे ज्ञानप्राप्ती
कासव हा एक असा प्राणी आहे जो जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकते. भक्ताने पण अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे. ती तयारी असेल, तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सान्निध्य लाभेल असेच काहीसे कासवाला सुचित करायचे असते. असे म्हणतात, की कासवाला त्याच्या सत्वगुणामुळे ज्ञानप्राप्ती झाली होती. पुराणात असे सांगितले जाते, कासवाला विष्णूकडून वरदान मिळाले होते, म्हणून विष्णूंनी कासवाला मंदिरासमोर जागा दिली. तुम्ही पाहिले असेल मंदिरासमोरील कासवाची मान कायम खाली वाकलेली असते, कासव श्रीविष्णूंना शरण आले होते म्हणून त्यांचे लक्ष नेहमी देवांच्या चरणांकडे असते.
कासवाला नमस्कार करून मंदिरात प्रवेश
कासव त्याचे अवयव जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याच्या कवचाच्या आतमध्ये घेवू शकते. हे अवयव म्हणजे चार पाय आणि एक तोंड होय. जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण देखील आपल्या पंचइंद्रियांवर ताबा ठेवला पाहिजे. भगवंताच्या चरणी जाताना आपण आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून पूर्ण श्रध्देने भगवंताशी एकरूप व्हावे ही म्हणजे त्याचे आशीर्वाद आपल्याला नक्की मिळतात ही त्यामागची संकल्पना आहे. कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभार्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे. याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरचं ईश्वराचे खरे दर्शन घडते असा आहे. कासवाची सहा अंगे म्हणजे चार पाय, एक तोंड आणि एक शेपूट म्हणजे मानवातील काम ,क्रोध ,मद , लोभ, मोह, मत्सर असे दुर्गूण होय. ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अंग आकुंचन घेऊन मंदिराच्या समोर असतो. त्याचप्रमाणे माणसाने आपले सर्व दुर्गुण सोडून मंदिरात प्रवेश करावा असे सांगण्याचा प्रयत्न केला जातो म्हणूनही कासव गाभाऱ्याबाहेर असते, असे म्हणतात.
तुकाराम महाराजांनी एका अभंगात लिहिले आहे,
कासवीची बाळे वाढे कृपादृष्टी, दुधासंगे भेटी नाही त्यांची
याचा अर्थ आहे कासवाची पिल्ले आईच्या दुधामुळे मोठी होत नाही. आई आपल्या पिल्लांवर सदैव कृपादृष्टी ठेवते. ते प्रेम, वात्सल्य यामुळे पिल्लांचे पोषण होते. त्या पाहण्याला किंवा दृष्टीला कूर्मदृष्टी असे म्हणतात म्हणून जेव्हा तुम्ही देवळात जाता तेव्हा, ‘हे देवा त्या कूर्मदृष्टीने माझ्याकडे पाहत राहा आणि तुझ्या पाहण्यातुनच आम्हाला मोठे होण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते मिळत राहो’ अशी प्रार्थना केली जाते.
कासवासंदर्भात आख्यायिका
कासवासंदर्भात आणखी एक आख्यायिका मिळाली ती म्हणजे, समुद्रमंथनाच्यावेळी देव आणि दानव यांनी वासुकी नागाची दोरी आणि मेरु पर्वताचा रवी करुन समुद्र घुसळायला सुरवात केली. घुसळता घुसळता मेरु पर्वत खाली खाली जाऊ लागला तेव्हा नारायणाने कूर्मावतार धारण केला. आता कूर्मावतार म्हणजे कासव आणि तुम्हाला माहित आहे, कासवाची पाठ अत्यंत कठीण असते पुर्वी तीचा उपयोग युद्धात ढाल बनवण्यासाठी करीत असत. तर असे हे कासवरुपी नारायण मेरु पर्वताच्या तळापाशी जाऊन बसले आणि मेरु पर्वताला बुडण्यापासुन वाचवले. यावरुन अशी प्रार्थना करावी, की हे देवा जेव्हा या भवसागरात किंवा संसारसागरात मी बुडु लागेन तेव्हा तु माझे बुडण्यापासुन रक्षण करावेस.
साने गुरुजींनी कासवासंदर्भात खूप छान सांगितले आहे. भारतीय संस्कृतीचा संयम हा एकप्रकारे आत्मा असून भारतीय संस्कृती संयमावर उभारलेली आहे. आपण देवळात जातो परंतु आधी बाहेर कासवाची मूर्ती असते. या कासवाचे दर्शन घेतल्याशिवाय त्याच्याकडे जाता येणार नाही. कारण कासव म्हणजे संयमाची मूर्ती. कासव आपले सारे अवयव क्षणात आत घेते. क्षणात बाहेर काढते. स्वतःच्या विकासावर आत्मविश्वास असेल, तर सारे अवयव बाहेर आहेत. स्वतःला धोका असेल, तर सारे अवयव आत आहेत. असे हे कासव भारतीय संस्कृतीने गुरुस्थानी मानले आहे. देवाकडे जायचे असेल, तर कासवाप्रमाणे होऊन जा. कासवाप्रमाणे स्वतःच्या इंद्रियांचे स्वामी व्हा. ज्याला जगाचे स्वामी व्हावयाचे असेल, त्याने आधी स्वतःचे स्वामी झाले पाहिजे. ज्याला देव आपलासा करून घ्यावयाचा आहे, त्याने स्वतःचे मन आधी आपल्या ताब्यात घ्यावयास पाहिजे.