गुरुनानक जयंतीनिमित्त गुरुद्वाऱ्यात गेलेले भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांच्यावर तिथले सेवेकरी चिडल्याचा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडीओ समोर आलेला आहे.
गुरुनानक जयंती असल्यानं तीनहात नाका परिसरात असलेल्या गुरुद्वाऱ्यात बरीच गर्दी होती. ठाण्याच्या दौऱ्यावर असलेले जे. पी. नड्डा गुरुद्वाऱ्यात पोहोचले. तिथे त्यांनी दर्शन घेतलं. नमस्कार केल्यानंतर ते फोटो काढण्यासाठी उभे राहिले. जे. पी. नड्डा पक्षाच्या नेत्यांसह पदाधिकारी, कार्यकर्त्यांना घेऊन गुरुद्वाऱ्यात पोहोचल्यानं तिथे सुरु असलेल्या कीर्तनात व्यत्यय आला. त्यामुळे गुरुद्वाऱ्यात असलेले सेवेकरी संतापले.
ठाणे शहरचे आमदार आणि भाजपचे उमेदवार संजय केळकर, भाजपचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघुले, विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे अशी नेतेमंडळी नड्डा यांच्यासोबत होती. गुरुनानक जयंती असल्यानं गुरुद्वाऱ्यात आधीच मोठी गर्दी होती. कीर्तनाचा कार्यक्रम सुरु होता. नड्डा यांच्यासह भाजप नेते मोठ्या संख्येनं आल्यानं कीर्तनात व्यत्यय आला. भाविकांचा खोळंबा झाला. त्यामुळे सेवेकरी संतापले. त्यांनी नड्डा यांच्यासह त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना बाहेर जाण्यास सांगितलं.
सेवेकरी संतापताच नड्डा आणि त्यांच्यासोबत असलेले सगळेच नेते, आमदार, पदाधिकारी गुरुद्वाऱ्यातून बाहेर पडले. गर्दीतून वाट काढत बाहेर निघणाऱ्या नड्डांचा व्हिडीओ समोर आला आहे. गुरुद्वाऱ्यातून बाहेर पडल्यानंतर आता नड्डा एका बुद्धिजिवींच्या कार्यक्रमात आहेत. ते त्यांच्याशी संवाद साधत आहेत. पण नड्डांसोबत गुरुद्वाऱ्यात घडलेला प्रकार चर्चेत आहे.