Bacchu Kadu: बच्चू कडूंच्या प्रहार पक्षाच्या उमेदवारानं काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे कडू यांच्या अमरावती जिल्ह्यातच प्रहारला झटका बसला आहे.
प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू, महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष छत्रपती संभाजी राजे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि विदर्भवादी नेते वामनराव चटप यांनी एकत्र येत परिवर्तन महाशक्तीची स्थापना केली. त्यांनी राज्यात १२१ उमेदवार दिलेले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी बच्चू कडू राज्यभरात सभा घेत आहेत. पण कडू यांना त्यांच्याच मतदारसंघात धक्का बसला आहे.
अमरावती जिल्ह्यातील अमरावती शहर विधानसभा मतदारसंघातून प्रहार जनशक्तीनं डॉ. सय्यद अब्रार यांना उमेदवारी दिली होती. ते पक्षाचे अधिकृत उमेदवार होते. पण आता मतदानाला चार दिवस राहिलेले असताना त्यांनी निवडणुकीतून माघार घेतलेली आहे. त्यांनी काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. सुनील देशमुख यांचा प्रचार करणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.
अमरावतीच्या पश्चिम भागात मुस्लिम मतदारांची संख्या अधिक आहे. हीच बाब लक्षात घेऊन कडूंनी पेशानं दंत चिकित्सक असलेल्या डॉ. सय्यद अब्रार यांना उमेदवारी दिली. अब्रार गेल्या अनेक विषयांपासून ते सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत. ते केवळ २० रुपयांत रुग्णांची तपासणी करतात. त्यामुळेच ते चर्चेत आले. त्यांच्या सामजिक कार्याची दखल घेत कडू यांनी त्यांना अमरावतीमधून उमेदवारी दिली.
अमरावती विधानसभेत काँग्रेसचे सुनील देशमुख विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुलभा खोडके अशी लढत आहे. मागील निवडणुकीत खोडके काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आल्या. त्यावेळी त्यांनी भाजपच्या सुनील देशमुख यांचा पराभव केला होता. काही दिवसांपूर्वीच खोडकेंनी काँग्रेसचा हात सोडत अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला. आता त्या महायुतीच्या उमेदवार आहेत.