Maharashtra Election 2024: गडहिंग्लज झालेल्या सभेत शरद पवारांनी कागलचे विद्यमान आमदार हसन मुश्रीफांना उघडे पाडले. जेव्हा साथ देण्याची वेळ होती तेव्हा सोडून गेल्याचे पवारांनी भर सभेत सांगितले.
भाषणाच्या सुरुवातीला शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत शाहू महाराजांना विक्रमी मतांनी विजय केल्याबद्दल मतदारांचे आभार मानले. त्यानंतर विधानसभा निवडणुकीवेळीच सत्ताधाऱ्यांना बहिणीची आठवण कशी झाली हे सांगितले. कागल परिसर हा ऐतिहासिक आहे, शाहू महाराजांचा वारसा असलेला परिसर आहे. येथील हसन मुश्रीफांना आम्ही शक्ती दिली. लोकांच्या पाठिंब्यावर त्यांना विधानसभेत जाता आले. राज्यात सत्ता असताना अनेक वेळा मंत्रीमंडळात संधी दिली. पण ज्यावेळी प्रामाणीक राहण्याची गरज होती, एकसंघ राहण्याची वेळ होती, साथ देण्याची गरज होती तेव्हा सोडून गेले. सोडून जाण्याआधी एक दिवस माझ्याकडे आले आणि आम्ही वेगळा विचार करतोय. आपण भाजप सोबत जाऊ असे मुश्रीफांनी सांगितले. त्यावर मी विरोध केल्याचे पवारांनी सांगितले.
भुजबळ म्हणाले- पुन्हा तुरुंगात जावे लागेल
सभेत बोलताना शरद पवार म्हणाले- छगन भुजबळांनी तर जाहीरपणे सांगितले की, एकदा तुरुंगात जाऊन आलो. हा निर्णय घेतला नसता तर आणखी तुरुंगात जावे लागले असते आणि तेथे गेल्यावर काय होते हे अनुभवले आहे. आता पुन्हा नको. ज्यांचे हात बरबटलेले असतात, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच अशी भीती असते असे पवारांनी सांगितले.
गेली १० वर्षात दोन वर्षाचा अपवाद वगळता भाजपची सत्ता आहे. या ८ वर्षात त्यांनी काय केले? ज्या प्रश्नाकडे लक्ष दिले पाहिजे होते तिकडे लक्ष दिले नाही. लोकसभा निवडणुकीत फटका बसाल म्हणून अनेक योजना आणल्या गेल्या. लाडकी बहिण योजना आणली. त्याबद्दल माझी तक्रार नाही.तुमच्या माझ्या मुलीला-बहिणांना सरकारकडून १५०० रुपये मिळत असतील तर त्याबद्दल तक्रार असण्याचे कारण नाही. पण हे प्रेम का आले? लोकसभेत त्यांनी फटाक दिला त्यामुळे आता बहिण आठवली. नाही तर बहिणीचा नोंद त्यांनी घेतली नसती.
फडणवीसांवर हल्ला
गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये एका वर्षात १३ हजार मुली बेपत्ता झाल्या. जो व्यक्ती एकेकाळी मुख्यमंत्री होता आता उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आहे. त्याच्या गावात १३ हजार मुली बेपत्ता होतात त्यांचा पत्ता लागत नाही असे सांगत हे कसे राज्य आहे असा सवाल केला. ज्यांची सत्ता असताना महिला सुरक्षित नाहीत अशा लोकांच्या हातात राज्य द्यायचे नाही, असे पवार म्हणाले.