Baramati News: मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द वापरून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्या बारामतीतील दोघांविरुद्ध मराठी बांधवांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
बारामतीतील दिलीप शिंदे, संतोष सातव यांनी व्हिडिओ चित्रीकरण करत मनोज जरांगे पाटील यांच्या बद्दल मानहानीकारक अपशब्द वापरून सदर व्हिडिओ चित्रीकरण काल दिनांक १३ नोव्हेंबर रोजी समाज माध्यमांवर प्रसारित केला. सदर बाब लक्षात येताच बारामतीतील जरांगे पाटील समर्थक व मराठा बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. सदर बाबत संतप्त समाजबांधव एकत्रित येऊन बैठक घेण्यात आली. आज झालेल्या या बैठकीत मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत केलेल्या अपमान कारक वक्तव्याबाबत निषेध व्यक्त करून शिंदे व सातव यांच्यावर पोलीस ठाण्यात तक्रारीचं निवेदन देण्यात आलं आहे.
सदर व्हिडिओ चित्रीकरणांमध्ये मनोज जरांगे पाटील यांना अपशब्द वापरून अरेतुरेची भाषा वापरून बदनामी करण्यात आली आहे. यामुळे मराठा समाजामध्ये तीव्र भावना निर्माण झाली असून, चीड व्यक्त केली जात आहे. निवडणुकीच्या काळात काही उद्रेक निर्माण झाल्यास तसेच कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास दिलीप शिंदे व संतोष सातव यांना जबाबदार धरण्यात यावे. तसेच याबाबत त्यांच्यावर योग्य ती कडक कारवाई करण्यात यावी. अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे.
ही महाराष्ट्राची संस्कृती नाही: उपमुख्यमंत्री अजित पवार
मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाचे नेतृत्व करत आहेत. मराठा समाजासाठी आरक्षण विषयक मागण्या विविध स्तरावर ते लावून धरत आहेत. त्यांनी मराठा समाजासाठी एक चळवळ उभी केलेली आहे. आज बारामतीतील एका व्यक्तीने मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात काही अपशब्द वापरलेले आहेत. त्यांच्या वक्तव्यांशी आम्ही सहमत नाही. अशा प्रकारे वैयक्तिक टीका टिप्पणी करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या ट्विटर हँडल वरून दिली आहे.