Alibaug Home Voting: रायगड जिल्ह्यातील अलिबाग, मुरुड आणि रोहा विधानसभा मतदारसंघात आज पहिल्या टप्प्यातील गृहमतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. अलिबाग मध्ये गृहमतदानासाठी एकूण ४८८ मतदार आहेत, यापैकी ४६९ मतदारांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.
अलिबाग मुरुड रोहा विधान सभा मतदारसंघात ४६९ मतदारांनी हक्क बजावला आहे. यामध्ये ४४२ ज्येष्ठ मतदार तर २७ दिव्यांग मतदारांचा समावेश आहे. तर दिव्यांग मतदाराचे १०० टक्के मतदान झाले आहे.
कोणताही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहू नये यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणा सज्ज आहे. दिव्यांग आणि वयोवृ्द्धांनी मतदानाचा आज हक्क बजावला. अतिदुर्गम भागात असलेल्या वयोवृद्ध आणि दिव्यांग मतदारांनी गृहमतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या उत्सवात आपलेही योगदान दिले असल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.
लोकशाहीसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. कोणताही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाने यंदा प्रथमच ८५ वर्षांवरील मतदार आणि ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. याच अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी किशन जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अलिबाग विधान सभा निवडणूक अधिकारी मुकेश चव्हाण यांच्या सूचनेनुसार एकूण ३७ पथकांमध्ये १८५ कर्मचाऱ्यांनी गृहभेट देत मतदान घेतले आहे.
भारत निवडणूक आयोगाने ८५ वर्षांवरील मतदार तसेच ४० टक्क्यांपेक्षा जास्त दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र असलेल्या मतदारांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे, असे अलिबाग विधानसभा मतदारसंघाचे निवडणुक निर्णय अधिकारी मुकेश चव्हाण म्हणाले आहेत.