Ashish Shelar: ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डानं दोनच दिवसांपूर्वी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. मविआच्या २६९ उमेदवारांना बोर्डाकडून समर्थन देण्यात आल्याची माहिती सज्जाद नोमानी यांनी दिली. याच नोमानी यांचा व्हिडीओ शेलारांनी शेअर केला आहे.
ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डानं दोनच दिवसांपूर्वी महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. मविआच्या २६९ उमेदवारांना बोर्डाकडून समर्थन देण्यात आल्याची माहिती सज्जाद नोमानी यांनी दिली. याच नोमानी यांचा व्हिडीओ शेलारांनी शेअर केला आहे. शेलारांनी व्हिडीओ पोस्ट करत महाविकास आघाडीला लक्ष्य केलं आहे. शेलारांच्या पोस्टमध्ये मविआच्या चार नेत्यांचा ‘विशेष’ उल्लेख आहे.
‘एक ऐसा व्होट जिहाद करो… जिसके सिपेसालार है : शरद पवार.. अझीम सिफाही है : उद्धव ठाकरे, राहुल गांधी, नानाजी पटोले और हमारा निशाना महाराष्ट्र नही…तो दिल्ली… ही मुक्ताफळे आहेत, ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे सज्जाद नोमानी यांची… २ तासांपूर्वी त्यांच्या अधिकृत युट्युब हँडलवर हा व्हीडिओ पोस्ट करण्यात आला आहे. उघडा डोळे, बघा नीट… म्हणूनच एक है तो सेफ है… एक है तो नेक है…’, असं शेलारांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या सज्जाद नोमानी यांचा शेलारांनी व्हिडीओ २१ सेकंदांचा आहे. त्यात ते ‘महाराष्ट्रात यांचा पराभव झाला, तर दिल्लीतलं सरकारदेखील जास्त दिवस टिकणार नाही. आमचं लक्ष्य केवळ महाराष्ट्र सरकार नाहीए, तर केंद्रीय सत्ता, देशाचं भवितव्य आहे,’ असं म्हणताना दिसत आहेत.
शेलारांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर शिवसेना उबाठाचे नेते आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली. ‘कमीत कमी आम्ही पाकिस्तानात जाऊन नवाझ शरीफच्या बिर्यानी आणि केक खाऊन आलो नाही. आता ज्यांचा व्हिडीओ शेअर केलाय, ते भारताचे नागरिक आहेत. ते काय दुसऱ्या देशाचे नागरिक आहेत का? आता हे वोट जिहादावर बोलणाऱ्या नेत्यांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी या सगळ्यावर दिल्लीत जाऊन बोलावं. व्हिडीओ पोस्ट करणाऱ्यांना मी काडीमात्र किंमत देत नाही. त्यांना मानसिकरित्या मदतीची गरज आहे,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.