PM Modi Promise for Maharashtra Farmer : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोयाबीनला प्रतिक्विंटल सहा हजार रुपये हमीभाव देण्याची घोषणा केली आहे. यापूर्वी, महायुती सरकारने सोयाबीन उत्पादकांना पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजनेची घोषणा केली होती. या घोषणांमुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील सोयाबीन उत्पादकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
दिवाळीपूर्वी येणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनची लागवड शेतकरी करतो. विदर्भ, मराठवाड्यात सोयाबीनचे अधिक उत्पादन होते. विदर्भाचा विचार करता वाशिम, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील काही भागांत सोयाबीनचे उत्पादन घेतले जाते. एकट्या पश्चिम विदर्भात ७१ अब्ज रुपयांहून अधिकचे सोयाबीनचे उत्पादन होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात. या शेतकऱ्यांना आधार म्हणून महायुती सरकारने पूर्वी पाच हजार रुपयांची मदत जाहीर केली होती. नंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजनेची घोषणा केली. या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात टाकणार, असे वचन दिले. यावरून शेतकरी आनंदी असतानाच आता सोयाबीनला सहा हजार रुपयांचा हमीभाव देण्याचे पंतप्रधान मोदींनी वचन दिल्याने सोयाबीन उत्पादकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
मुळात दिवाळी आणि नंतरच्या दिवसांतील ग्रामीण भागातील अर्थकारण सोयाबीनच्या उलाढालीवर अवलंबून असते. नेमक्या याच पिकासाठी दिलासादायी घोषणा होत असल्याने समाधान व्यक्त होऊ लागले असल्याची माहिती बुलढाणा जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने दिली.
बाजारात नवचैतन्य
आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावांतर योजना आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा हजार रुपयांचा हमीभाव देण्याची घोषणा केल्याने बाजारातही नवचैतन्य आले आहे. दिवाळीच्या दिवसांतच हे घडल्याने शेतकऱ्यांसोबतच व्यापारीही या घोषणांच्या अनुषंगाने नियोजन करू लागला आहे. सरकारी दरासोबतच खुल्या बाजारातही सोयाबीनला अधिक दर मिळण्याची चिन्हे यानिमित्ताने असल्याचे सूत्रांनी सांगितले.