2019 ला शरद पवारांमुळेच राष्ट्रपती राजवट लागू झाली, देवेंद्र फडणवीसांनी सांगितली ‘अंदर की बात’

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९ च्या सत्तानाट्यावर भाष्य करताना शरद पवारांमुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचा दावा केला आहे. फडणवीसांनी सांगितले की, सरकार स्थापन करायचे नसल्याचे सांगणारे पत्र पवारांनीच लिहिले होते आणि त्यांच्याच सूचनेनुसार त्यात बदल करून राज्यपालांकडे पाठवण्यात आले होते.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : विधानसभा निवडणुक तोंडावर असताना २०१९ च्या सत्तानाट्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोठे खुलासे केले आहेत. महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये शरद पवारांमुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याचं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. शरद पवार यांच्या एका पत्रामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली असं फडणवीस म्हणाले. ते पत्र नेमके कसले होते आणि त्यामध्ये काय होतं यासंदर्भात फडणवीसांनी सांगितलं आहे.

राष्ट्रपती राजवट लागण्याचा किस्साही मी तुम्हाला सांगतो. सरकार स्थापण्याबाबत आम्हाला विचारले, त्यावर आम्ही नाही असे सांगितले. आमच्यानंतर राज्यातील दुसरा मोठा पक्ष हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना असल्याने त्यांना विचारण्यात आले. आता ते आमच्यासोबत महायुतीमध्ये असल्याने ते आमच्याशिवाय सरकार स्थापनेचा दावा करू शकत नव्हते. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची झाल्यास त्याआधी राज्यपालांना राज्यातील तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्या दाव्याबाबत विचारणे क्रमप्राप्त होते, असं फडणवीसांनी सांगितलं.

शरद पवारांनाही सरकार स्थापनेचा दावा करायचा नव्हता. तशाप्रकारचे पत्र माझ्याच कार्यालयात टाईप झाले. माझ्याकडे पत्र टाइप झाल्यानंतर पवारांची संमती घ्यायची होती. त्यावेळी खासदार संजय राऊत यांना हृदयविकाराचा झटका आल्याने ते उपचारासाठी लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले होते. पवार त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी तिथे होते. त्यामुळे आम्हाला सरकार स्थापन करायचे नाही असे सांगणारे पवारांचे ते पत्र मी पवारांच्या अंतिम संमतीसाठी रुग्णालयामध्ये पाठवले. तिथे पत्र वाचल्यानंतर पवारांनी मला त्यात दोन बदल सुचवले. त्यानुसार मी ते केले आणि राज्यपालांकडे पाठवले. जर हे सर्व मी राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी केले असे शरद पवार सांगत असतील तर प्रत्यक्षात राष्ट्रपती राजवट हीच त्यांच्या पत्रामुळे लागू झाल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वास्तविक आमची कधीही शरद पवार यांच्यासोबत युती नव्हती. उद्धव ठाकरे हे आमच्यासोबत महायुतीमध्ये होते. हे तर उद्धव ठाकरे यांनी आम्हाला दगा दिल्यानंतर पुढचे घडत गेले. राजकारणामध्ये हरता येत नाही. तगावे लागते, जिंकावे लागते. आम्ही आमच्याबाजूने बोलणी करत नव्हतो, मात्र आम्हाला जेव्हा लक्षात आले की उद्धव ठाकरे हे आता पुढे गेले, तसेच आम्हाला पण समोरून संदेश आला तेव्हा आम्हाला ती अमृतवडी वाटली, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Source link

ajit pawarDevendra FadnavisSharad Pawarvidhansabha nivadnuk resultअजित पवारराष्ट्रपती राजवटविधानसभा निवडणूकशरद पवार
Comments (0)
Add Comment