Pratap Sarnaik Exclusive Interview: बाळासाहेब यांनी दिलेल्या माफी पूर्वी एकनाथ शिंदे यांना मिळालेली वागणूक येथूनच बंडाची खरी सुरुवात झाली, असे त्यांनी सांगितले.
‘ठाणे महापालिका निवडणुकांनंतर २००९ मध्ये मनसेला नऊ जागा मिळाल्याने महापौरपदासाठी काट्यावरील लढाई होती. मनसेच्या पाठिंब्याशिवाय महापौर निवडून येणे कठीण असल्याने आम्ही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलो होतो. त्यांच्याकडून कोणतेही आश्वासन मिळाले नाही. मनसेचीही त्यावेळी अजित पवार यांच्याशी चर्चा सुरू होती. शिवसेनेचा महापौर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पूर्ण तयारी केली होती. परंतु शिवसेनेचा महापौर होणार हे कळल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात येऊन पत्रकार परिषद घेऊन आम्हाला पाठिंबा जाहीर केला. तसेच एकनाथ शिंदे, प्रताप सरनाईक आणि राजन विचारे आमच्याकडे पाठिंब्यासाठी आल्याचेही जाहीर केले.
त्यानंतर ‘मातोश्री’ची दारे आमच्यासाठी बंद झाली होती. एकनाथ शिंदे यांना बाहेर बसावे लागले. बाळासाहेबांचे शिंदे यांच्यावर प्रेम असल्यामुळे त्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांना सांगून भगव्या झेंड्यासाठी त्यांनी ही पावले उचलल्यामुळे त्यांना माफ करून टाक, असे सांगितल्यानंतर आम्हाला माफी मिळाली होती. परंतु बाळासाहेब यांनी दिलेल्या माफी पूर्वी एकनाथ शिंदे यांना मिळालेली वागणूक येथूनच बंडाची खरी सुरुवात झाली’, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे व्हावेत ! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमच्या पक्षाचे नेते असल्यामुळे तेच भविष्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे, असे आम्हाला वाटते. परंतु महायुतीत निवडणुका लढवत असल्यामुळे सर्वांच्या सहमतीने निर्णय घेतला जाईल. भाजपचे वरिष्ठ नेते अमित शहा यांनीही सर्वांचा विचार घेऊनच यासंदर्भातील निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. असे असले तरी आमच्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवली जात आहे, हे देखील तितकेच खरे आहे, असेही प्रताप सरनाईक म्हणाले.