Uddhav Thackeray Nashik Rally : ‘धर्मयुद्ध आयोगाला चालते का ?’ असा प्रश्न उपस्थित करीत ठाकरे यांनी धर्माच्या नावाने नव्हे, तर स्वतःच्या कर्माच्या नावे मते मागा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाला केले
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
‘धर्मयुद्ध आयोगाला चालते का ?’ असा प्रश्न उपस्थित करीत ठाकरे यांनी धर्माच्या नावाने नव्हे, तर स्वतःच्या कर्माच्या नावे मते मागा, असे आवाहन भारतीय जनता पक्षाला केले आहे. ‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी स्वतःची कर्म काय आहेत ती तपासली पाहिजेत. तुमचे एवढेच बाळासाहेब ठाकरे यांच्यावर प्रेम होते, तर आमचे सरकार का पाडले, शिवसेना का फोडली? आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत दिलेला शब्द अमित शहा यांनी का फिरवला,’ असे प्रश्नही ठाकरे यांनी उपस्थित केले.
‘भाजपने निवडणुकीत संथ गतीने मतदान होऊ द्या, अशा सूचना केल्या होत्या,’ असा आरोपही त्यांनी केला. ‘तुमची हिंमत असेल, तर निवडणूक आयोग ईडी, सीबीआय बाजूला ठेवून समोरासमोर या,’ असे आव्हानही त्यांनी दिले.
राज्यद्रोह्यांना मत नको
‘महायुतीचे नेते महाराष्ट्र गुजरातच्या चरणी वाहायला निघाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्र द्रोह्यांना मत म्हणजे महाराष्ट्राशी गद्दारी, असे सांगत भाजप, मिंधे आणि अजित पवारच्या कार्यकत्यांनी यांना मते देऊ नयेत’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. ‘माझ्या अंगात प्राण आहे, तोपर्यंत यांना महाराष्ट्र लुटू देणार नाही, असे सांगत आम्ही शिवसेनेची भाजप होऊ दिली नाही, तर काँग्रेस कुठून होऊ देऊ’, असे प्रत्युत्तरही भाजपला दिले. पोलिसांनो, तुम्ही दहा दिवस थांबा, राज्यात आमचेच सरकार येणार आहे. मिंधेंसह त्यांच्या साथीदारांना तुरुंगात टाकू, असा इशाराही यावेळी उद्धव ठाकरे यांनी दिला.