मुंबईत एका पोलीस शिपायावर टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. गणेश अशोक शिंदे असे या शिपायाचे नाव आहे. मतदानाची गोपनियता भंग झाल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने मोठा गोंधळ झाला होता.
टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने कायदेशीर आदेशाची अवज्ञा झाली तसेच मतदानाची गोपनियता भंग झाल्यामुळे आता गणेश शिंदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलीये. याची माहिती 185 मलबार हिल विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी दिली. सोशल मीडियावर फोटो शेअर करणे गणेश शिंदे यांच्य अंगलट आल्याचे बघायला मिळतंय.
टपाली मतपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर टाकणं अंगलट, मुंबईत पोलिस शिपायावर गुन्हा
सर्व मतदारांना मतदान केंद्रावर फोन वापरण्यास पुर्णपणे बंदी असल्याबाबत तसेच मतदारांनी त्यांचे मतदान करीत असताना पुर्णतः गोपनियता बाळगून, मतदान करावे व मतदान पुर्ण केल्यानंतर, बॅलेट मतपत्रिका व 13ए फॉर्म हा त्यासोबत असलेल्या लिफाफ्यात भरुन सदरचा लिफाफा बंद करून केवळ मतदान कक्षात ठेवलेल्या मतदान पेटीत टाकण्याबाबत सुचित केले होते. अशी माहिती मतदान केंद्राध्यक्ष प्रसन्न मधुसुदन तांबे यांनी दिली. पोलीस शिपाई गणेश अशोक शिंदे यांनी मतपत्रिकेची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाणे, मुंबई येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.