Nanded Bhokar Vidhan Sabha Nivadnuk : नांदेडमध्ये सख्ख्या दाजी आणि मेव्हण्याची प्रतिष्ठा पणाला लागली असून अशोक चव्हाण लेक श्रीजया यांच्यासाठी, तर भास्करराव पाटील खतगावकर यांनी सुनेसाठी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
अख्खं चव्हाण कुटुंबीय मैदानात
भोकर मतदारसंघातून चव्हाण कुटुंबियांची तिसरी पिढी तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची लेक श्रीजया चव्हाण निवडणुकीच्या रिंगणात आहे. लेकीच्या विजयासाठी अशोक चव्हाण हे भोकर मतदारसंघात तळ ठोकून आहेत. लेकीच्या प्रचारासाठी अख्खं चव्हाण कुटुंबीय मैदानात उतरले आहे. गाठीभेटी आणि कॉर्नर सभांवर भर दिला जातं आहे. शिवाय भाजपच देखील भोकर मतदारसंघाकडे विशेष लक्ष असल्याच पाहायला मिळत आहे.
लेकीच्या प्रचारासाठी अशोक चव्हाण मतदारसंघात तळ ठोकून
श्रीजया चव्हाण यांच्यासाठी मागील सहा दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजप नेत्या पंकजा मुंडे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे, आंध्रप्रदेशचे उपमुख्यमंत्री तथा सिने अभिनेते पवन कुमार यांची जाहीर सभा घेण्यात आली. लोकसभा निवडणुकीत झालेला फटका विधानसभेत होऊ नये यासाठी अशोक चव्हाण हे विशेष लक्ष असल्याचं चित्र आहे. इतर मतदारसंघाची जबाबदारी असताना चव्हाण हे मतदारसंघात तळ ठोकून आहेत.
नांदेडमध्ये विधानसभेसाठी प्रतिष्ठापणाला
दुसरीकडे माजी खासदार भास्करराव पाटील यांची देखील सुनबाईंसाठी प्रतिष्ठापणाला लागली आहे. भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सुनबाई डॉ. मीनल खतगावकर या नायगाव मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवत आहेत. भास्करराव पाटील खतगावकर हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे सख्खे दाजी आहेत. तीन वेळा ते खासदार झाले आहेत, जिल्ह्यात त्यांची चांगली पकड आहे. भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सुनबाईंला निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. सुनेसाठी खतगावकर यांनी प्रचाराची धुरा देखील सांभाळली आहे. या प्रतिष्ठेच्या लढाईत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर या दाजी – मेव्हण्याला कितपत यश मिळेल हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.
अशोक चव्हाण लेकीसाठी, तर सुनेसाठी खतगावकर मैदानात; नांदेडमध्ये सख्ख्या दाजी आणि मेव्हण्याची प्रतिष्ठा पणाला!
पत्नीसाठी पतीची पराकाष्ठा
लोहा या हायव्होल्टेज मतदारसंघात शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांना पराकाष्ठा करावी लागत आहे. त्यांची पत्नी आशाताई शिंदे ह्या भावा विरोधात निवडणुकीच्या रिंगणात आहेत. आशाताई शिंदे ह्या प्रताप पाटील चिखलीकर यांच्या त्या सख्खी भगिनी आहेत. २०१९ च्या निवडणुकीत शेकापकडून श्यामसुंदर शिंदे विजयी झाले होते. यंदा त्यांची पत्नी निवडणूक लढवत आहे. पत्नीला निवडून आणण्यासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांना पराकाष्ठा करावी लागतं आहे.