Nitin Gadkari Remarks on Batenge to Katenge: राज्यात सध्या भाजपच्या ‘बटेंगे तो कटेंगे’ आणि ‘एक रहेंगे, तो सेफ रहेंगे’ या नाऱ्यावरुन वादंग निर्माण झाला आहे. यावर केंद्रीय मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनीही या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीन गडकरींनी भाजपच्या प्रचार मुद्द्यांबरोबरच महायुतीच्या संभाव्य विजयाबद्दल भाष्य केले आहे. योगी आदित्यानाथांनी दिलेल्या बटेंगे तो कटेंगे या नाऱ्यावर नितीन गडकरी म्हणाले, माझ्या समजुतीनुसार, आपण जात, धर्म, भाषा आणि लिंग या आधारावर विभागले जाऊ नये. आपण संघटित झाले पाहिजे. आपण भारतीय आहोत आणि आपल्याला एकसंध राहायला हवे, असा त्यातील संदेश आहे. त्यांचे म्हणणे असे की, आपण वेगवेगळे पक्ष आहोत आणि आपण युती केली आहे. आपण एक पक्ष आहोत तर आपले एकच विचार मांडले गेले पाहिजे. प्रत्येक पक्षाची एक खास गोष्ट आहे. हे राजकारणात चालते आणि त्यामुळेच ही युती आहे.
नितीन गडकरी पुढे म्हणाले, महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारने राज्यात चांगल्या योजना आणल्या आहेत. त्यामुळे याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. याच पार्श्वभूमीवर २३ तारखेनंतर राज्यात काही मोठा खेला, गेम होईल असे आपल्याला वाटत नाही. पण आमच्या ताकदीवर आम्ही बहुमत खेचून आणू आणि राज्यात महायुतीचे सरकार बहुमताने निवडून येईल, असा विश्वास देखील गडकरींनी व्यक्त केला आहे.
दरम्यान नितीन गडकरींनी उद्धव ठाकरेंच्या सोबतच्या संबंधांवर देखील आपले मत मांडले आहे. गडकरी म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. राजकारणात आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. विचारांच्या आधारावर आमच्यात मतभेद जरुर आहेत. पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाही. आम्ही विचारांच्या आधारावर एकमेकांविरुद्ध असू, अशी माझी समजूत आहे.’ तर ‘निवडणुकीत सर्वच पक्ष मतदारांना मतदानासाठी आवाहन करतात. मी पण काँग्रेसच्या मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करत असतो. खरंतर निवडणुकीत कामगिरीवर चर्चा व्हायला हवी,’ असेही गडकरींनी अधोरेखित केले आहे.