Nana Patole Statement on Maharashtra CM post: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? यावरुन अनेक दावे प्रतिदावे केले जात असताना नाना पटोलेंनी आता स्वत:च्या मुख्यमंत्रीपदाबाबत अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मविआचे आमगाव-देवरी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजकुमार पुराम यांच्या प्रचारसभेत उपस्थिती लावली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदाबाबत संकेत दिले. ‘राजकुमार पुराम याला आमदार बनवायचे आहे. नाही बनवलं तर, महाराष्ट्रात नानाभाऊ उद्या काय बनणार आहे हे तुम्हाला माहीतच आहे. तुम्ही एक एक आमदार नाही दिले तर अडचण येणार आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचे संकेत त्यांनी दिले. प्रचाराच्या या रणधुमाळीत नाना पटोलेंनी मुख्यमंत्रीपदाबाबत वक्तव्य केल्याने मात्र अनेकांच्या भुवया मात्र उंचावल्या आहेत.
नाना पटोले म्हणाले, ‘राजकुमार पुरामला यंदा आमदार बनवावं लागेल. तुम्ही एक एक आमदार नाही दिला तर अडचण येणार आहे. कारण पुढे मी महाराष्ट्रात काय बनणार आहे हे तुम्हाला माहितच आहे.’ यासोबतच नाना पटोलेंनी राजकुमार यांच्यासाठी मतदारांना आवाहन केले. ‘शेतकऱ्यांचे, गरिबांचे सरकार आणायचे असेल तर पुरामला निवडून आणावं लागेल. ही वेळ आपल्या आत्मसन्मानाची आहे. मोठ्या परिश्रमाने मी इथपर्यंत आलो आहे. महाराष्ट्रात परिवर्तन होणार आहे, या परिवर्तनात राजकुमार पुरामला विधानसभेत पाठवा.’ असे पटोले म्हणाले आहेत.