Maharashtra Election 2024: ज्यांनी पैशांच्या जोरावर राज्यातील सरकार चोरले असे लोक संविधानाच्या गोष्टी बोलतात, असे सांगत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला केला.
महाराष्ट्राने नेहमी देशाला दिशा देण्याचं काम केलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला गप्प बसून चालणार नाही.प्रामाणीक होण्याची जबाबदारी फक्त जनतेची आहे का? व्यासपीठावरून भाषण ठोकणाऱ्यांची जबाबदारी नाही का? असा सवाल प्रियांका गांधी यांनी कोल्हापुरात झालेल्या सभेत केला.
सत्ताधाऱ्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहिण योजना आणली. आम्ही कर्नाटकात सरकार आल्यानंतर गृहलक्ष्मी योजना आणली. आता राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर महिलांना महिन्याला ३ हजार रुपये दिले जातील. जातनिहाय जनगणना केली जाईल, आरक्षणाची मर्यादा वाढवणार, २५ लाखापर्यंतची आरोग्य सेवा मोफत दिली जाणार, शेतकऱ्यांचे ३ लाखापर्यंतचे कर्ज माफ केले जाणार, तरुणांना महिन्याला ४ हजार रुपये भत्ता दिला जाणार असल्याचे प्रियांका यांनी सांगितले.
मुंबईतील भाषणात मोदी म्हणाले, राहुल गांधी आरक्षणाच्या विरोधात आहेत. जवाहरलाल नेहरू आरक्षणाच्या विरोधात आहेत. नेहरूनी तर आरक्षण सुरू केले. राहुल गांधींनी कन्याकुमारी ते काश्मीर भारत जोडो यात्रा काढली, मणिपूर ते मुंबई न्याय यात्रा केली. प्रत्येक ठिकाणी त्यांनी जात जनगणना करणार असल्याचे सांगितले, ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवणार असल्याचे सांगितले. मोदींना काय वाटते देशाला दिसत नाही आणि तुम्ही व्यासपीठांवर काहीही बोलाल. ज्या सरकारला राज्यातील जनतेने निवडून दिले त्याला तुम्ही पैशांच्या जोरावर, हजारो कोटी रुपये देऊन सरकारची चोरी केली आणि तुम्ही संविधानाच्या गोष्टी करत आहात? तुम्ही संविधानाला वाचवणार? असा परखड सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला.
मी मोदींना आणि अमित शहांना आव्हान देते. त्यांनी व्यासपीठावर उभे राहून सांगावे की आम्ही जात जनगणना करणार, आम्ही ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू. पण ते व्यासपीठावर खोट बोलतात की माझा भाऊ आरक्षणाच्या विरोधात आहे.